US Elections Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देशात काही नवे बदल करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेतील निवडणुकांमध्ये व्यापक बदल करण्यासंदर्भातील एका कार्यकारी आदेशावर त्यांनी मंगळवारी (२५ मार्च) स्वाक्षरी केली. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या फेडरल (केंद्रीय) निवडणुकीत मतदान नोंदणीसाठी नागरिकत्त्वाचे दस्तावेज सादर करणे अनिवार्य केले आहे. म्हणजेच भारतात निवडणुकीत मतदान करण्यापूर्वी मतदार ओळखपत्र (व्होटर आयडी) किंवा आधार कार्ड सादर करावे लागते, त्याचप्रमाणे अमेरिकेत देशाच्या नागरिकांना त्यांचे दस्तावेज दाखवावे लागतील. जो व्यक्ती हे दस्तावेज सादर करेल तोच मतदान करण्यासाठी स्वतःच्या नावाची नोंदणी करू शकेल.

ट्रम्प यांनी अमेरिकेतील केंद्रीय निवडणुकीसाठी मतदान नोंदणी करण्यासाठी नागरिकांना नागरिकत्व सिद्ध करणारे कागदपत्र सादर करणे अनिवार्य केले आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे भारतात आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र पुरावा म्हणून सादर करावं लागतं, त्याचप्रमाणे आता अमेरिकेतील नागरिकांना केंद्रीय निवडणुकीवेळी मतदार नोंदणी करताना असे ओळखपत्र पुरावा म्हणून सादर करावे लागेल. त्याशिवाय अमेरिकन नागरिकांना मतदान करण्यासाठी स्वतःची नोंदणी करता येणार नाही.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

“भारत आणि ब्राझीलसारखी राष्ट्रे मतदान ओळखपत्र बायोमेट्रिक डेटाबेसशी जोडत आहेत. मात्र, अमेरिका याबाबतीत अजूनही सेल्फ अटेस्ट करण्यावर अवलंबून आहे. या बदलांचा उद्देश निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुरक्षितता आणणे हा आहे”, असा दावा ट्रम्प यांनी यावेळी केला.

ट्रम्प यांनी म्हटलं आहे की “जर्मनी व कॅनडामध्ये मतपत्रिकेद्वारे मतदान घेतलं जातं. तर, अमेरिकेत मतदानाच्या अनेक पद्धती आहेत. पण नोंदणी प्रक्रियेत काही कमतरता आहेत. नव्या आदेशामुळे आपण हे सुनिश्चित करू की मतदार नोंदणी प्रक्रिया काटेकोरपणे पाळली जाईल आणि त्यात कोणतीही अनियमितता आढळणार नाही.”

मेल-इन वोटिंगची सुविधा असुरक्षित – ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, डेन्मार्क व स्वीडनसारख्या देशांमध्ये जे लोक मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यास असमर्थ असतील त्यांच्यासाठी मेल-इन वोटिंगची सुविधा आहे. मात्र, त्यातून फसवणूक होऊ शकते. ती पद्धत थोडीशी असुरक्षित आहे. अमेरिकेतील काही निवडणुकांमध्ये देखील ही प्रणाली वापरली जाते. अनेक अधिकारी पोस्टमार्क नसलेल्या आणि निवडणुकीच्या तारखेनंतरच्या मतपत्रिका देखील स्वीकारतात.