पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्यावरून भारतात परतले आहेत. आधी मोदी अमेरिकेत गेले, तिथल्या अनेक मान्यवरांच्या, नेतेमंडळींच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या. त्यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते. याही भेटीत त्यांनी अशाच भेटीगाठी घेतल्या. या सर्व चर्चांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतातील मुस्लिमांच्या स्थितीबाबत केलेल्या विधानाची विशेष चर्चा झाली. याच विधानावर आता अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या माजी अध्यक्षांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले होते बराक ओबामा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भेटीनंतर बराक ओबामांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका मांडली होती. “जर नरेंद्र मोदींशी माझी चर्चा झाली, तर मी त्यांच्याकडे भारतातील अल्पसंख्याकांच्या अधिकारांविषयीचा मुद्दा उपस्थित करेन. मी त्यांना सांगेन की जर तुम्ही अल्पसंख्याकांच्या अधिकारांचं संरक्षण केलं नाही, तर भारतात दुफळी माजण्याची गंभीर शक्यता आहे. अशा प्रकारच्या अंतर्गत वादांनंतर काय घडतं हे आपण पाहिलं आहे. हे भारताच्या सार्वत्रिक हिताच्या विरोधी ठरेल”, असं ओबामा म्हणाले होते.
“ओबामांनी त्यांची शक्ती…”
दरम्यान, बराक ओबामांनी त्यांची शक्ती भारताचं कौतुक करण्यावर खर्च करावी, असा सल्ला अमेरिकेच्या धर्मस्वातंत्र्यविषयक आयोगाचे माजी प्रमुख जॉनी मूरे यांनी दिला आहे. “माजी अध्यक्षांनी त्यांची शक्ती भारतावर टीका करण्यापेक्षा भारताचं कौतुक करण्यावर खर्च करावी. भारत हा मानवजातीच्या इतिहासातला सर्वाधिक विविधता असणारा देश आहे. भारतातही उणीवा आहेत, जशा त्या अमेरिकेतही आहेत. पण भारताची विविधता ही त्यांची शक्ती आहे. आपण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं कौतुक करायला हवं”, असं मूरे म्हणाले.
“तुमच्या मित्रांवर तुम्ही खासगीमध्ये टीका करवी आणि जाहीररीत्या कोतुक करावं. ओबामांनी मोदींवर टीका करतानाच त्यांचं कौतुकही केलं हे मी समजू शकतो. त्यांनीही मोदींबरोबर काही काळ घालवला आहे”, असंही मूरे म्हणाले.