भारतात नेस्लेच्या मॅगी नूडल्सवर बंदी कायम असली तरी अमेरिके च्या अन्न व औषध प्रशासनाने मात्र त्यांनी केलेल्या चाचण्यात शिशाचे प्रमाण अमेरिकेतील मान्यता प्राप्त पातळीच्या आतच असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी भारतातून ब्रिटनमध्ये तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यातही शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेटचे प्रमाण त्या देशात प्रमाणित पातळीत असल्याचे सांगण्यात आले होते.
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या प्रवक्तयाने सांगितले की, नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्समध्ये शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेटचे प्रमाण मर्यादेत आहे. आम्ही काही नमुन्यांची चाचणी केली होती, त्यात या दोन्ही घटकांचे प्रमाण घातक नव्हते. दरम्यान केंद्र सरकारने मॅगी नूडल्स प्रकरणी भारत सरकारने नेस्ले कंपनीकडे ६४० कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. या कंपनीने व्यावसायिक संकेतांचे उल्लंघन केले व वेष्टनावरील माहितीतही त्रुटी होत्या असा आरोप सरकारने केला आहे. मात्र अशी कुठली नोटीस मिळाल्याचा नेस्ले कंपनीने इन्कार केला आहे.
नेस्लेच्या भारतातील प्रवक्तयाने सांगितले की, मॅगी नूडल्स भारतातून अमेरिकेत आयात केल्या जातात पण त्यात शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेट घातक प्रमाणात आढळले नसल्याचे तेथील चाचण्यात दिसून आले आहे.
इंग्लंड, सिंगापूर, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व व्हिएतनाम या देशांनीही मॅगी खाण्यास योग्य असल्याचा निर्वाळा आधीच दिला आहे. जून महिन्यात भारताच्या एफएसएसएआय संस्थेने मॅगीवर बंदी घालण्याचा आदेश जारी करताना या नूडल्स खाण्यास असुरक्षित असल्याचे म्हटले होते.

Story img Loader