डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार रॅलीत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली, त्यामुळे ते थोडक्यात बचावले. अशात डोनाल्ड ट्रम्प या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे. कारण ते पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. निवडणूक प्रचार रॅली दरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले.कानाजवळून गोळी चाटून गेल्याने त्यांना जखम झाली आणि त्यांचा चेहरा रक्ताने माखला होता. तातडीने सुरक्षा रक्षकांनी कडं करुन त्यांना स्टेजवरुन सुरक्षित स्थळी नेलं. यानंतर इस्कॉनचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी ४८ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग सांगितला आहे. तसंच भगवान जगन्नाथांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव वाचवल्याचं म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे इस्कॉनच्या राधारमण दास यांनी?
“देवाच्या दयेनेच ट्रम्प वाचले आहेत. ४८ वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगन्नाथ रथयात्रा उत्सवाला सहकार्य केलं होतं. आज घडीला जगन्नाथाची यात्रा सुरु आहे त्यावेळी ट्रम्प यांच्यावर जो हल्ला झाला त्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा जीव वाचवून भगवान जगन्नाथाने एक प्रकारे ही परतफेडच केली आहे. जुलै १९७६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ISKCON च्या अनुयायांना डोनाल्ड ट्रम्प यांनी रथाच्या निर्मितीसाठी ट्रेन यार्ड मोफत दिले होते. आज जगात ९ दिवसांचा रथयात्रा उत्सव सुरु आहे. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला. मात्र भगवान जगन्नानाथाने ट्रम्प यांचा जीव वाचवला. डोनाल्ड ट्रम्प १९७६ मध्ये ३० वर्षांचे होते त्यावेळी त्यांनी जे सहकार्य केलं त्यामुळे महाप्रभू जगन्नाथ यांची पहिली रथयात्रा न्यूयॉर्कच्या रस्त्यावर निघाली होती. आजपासून ४८ वर्षांपूर्वी इस्कॉनने न्यूयॉर्कमध्ये पहिली रथयात्रा आयोजित करण्याची योजना आखली होती तेव्हा समोर अनेक आव्हानं होती.”
हे पण वाचा- Donald Trump Rally Firing: …अन्यथा ट्रम्प यांचा जीव गेला असता; जाणून घ्या काय घडलं?
आम्हाला रथनिर्मितीसाठी जागा हवी होती
Fifth Avenue या ठिकाणी रथयात्रेसाठी संमती मिळणं ही गोष्ट इस्कॉनसाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती. मात्र त्याचवेळी आम्ही सगळेच रथनिर्मिती करता येईल अशी जागा शोधत होतो. त्यावेळी उदयोन्मुख नेते असलेले डोनाल्ड ट्रम्प यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं. त्यांनी ट्रेन यार्डची जागा आम्हाला विनामूल्य उपलब्ध करुन दिली त्यामुळे न्यूयॉर्कमधून रथयात्रा निघू शकली. भगवान जगन्नाथाचा रथ हा लाकडाचा असतो. त्या रथाच्या निर्मितीसाठी आम्हाला जागा हवी होती. जी सहजपणे उपलब्ध होत नव्हती. अनेक जण विम्याचं किंवा इतर कारण देऊन आम्हाला जागा नाकारत होता. त्यावेळी ट्रम्प यांनी मनाचं औदार्य दाखवलं आणि आम्हाला जागा उपलब्ध करुन दिली.
डोनाल्ड ट्रम्प आमच्या मदतीला धावले
इस्कॉनचे प्रवक्ते आणि उपाध्यक्ष पोस्टमध्ये पुढे म्हणाले, “आम्हाला न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर रथयात्रेची संमती मिळाली. त्याचा आम्हाला आनंद झाला. मात्र रथाच्या निर्मितीसाठी आम्हाला नकारच मिळाला त्यामुळे अनेक भाविक नाराज झाले होते. त्यावेळी आम्हाला डोनाल्ड ट्रम्प नावाचा आशेचा किरण दिसला. डोनाल्ड ट्रम्प यांनी रेल्वेचं यार्ड विकत घेतलं होतं. पेनसिल्व्हेनिया या ठिकाणी ते यार्ड होतं. ट्रम्प आम्हाला रथ निर्मितीची संमती त्या जागेत देतील का? याचीही चिंता होतीच कारण जवळपास डझनभर लोकांचा नकारच आम्ही त्याआधी पचवला होता. तरीही आमच्यातले काही अनुयायी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयात गेले. त्यांना महाप्रसाद दिला. त्यावेळी त्यांच्या सचिवांनी आम्हाला सक्त ताकीद दिली होती की डोनाल्ड ट्रम्प हे तुम्हाला रथनिर्मितीसाठी जागा देण्यास नकार देणार आहेत. त्यामुळे विचारायचं तर विचारा पण ते असहमती दर्शवतील याची तयारी ठेवा.”
आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्हाला रथ निर्मितीची संमती दिली
राधारमण दास पुढे म्हणाले, “आम्ही तरीही आशा सोडली नाही, भगवान जगन्नाथावर विश्वास ठेवला आणि चमत्कार घडेल अशी अपेक्षाही केली. आम्ही त्यांच्यापुढे आमचा जागेसाठीचा प्रस्ताव पत्राद्वारे ठेवला. तीन दिवसांनी त्यांच्या सेक्रेटरीचा आम्हाला फोन आला. त्यांनी सांगितलं की, काय झालं ते मला माहीत नाही. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी तुमचं पत्र वाचलं आहे. त्यांनी रथाच्या निर्मितीसाठी जागा देण्यास सहमती दर्शवली आहे. तुम्ही या आणि त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र घेऊन जा. त्यांनी रथनिर्मिती साठी यार्डाची जागा देण्याचं मान्य केलं आहे. आम्ही जाऊन पत्र घेतलं ज्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली होती.” हा अनुभव इस्कॉनचे प्रवक्ते आणि उपाध्यक्ष राधारमण दास यांनी सांगितला आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.