अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्या कानाला चाटून गोळी गेली आणि ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. जगभरात हा विषय चर्चिला जातो आहे. तसंच सोशल मीडियावरही या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. अशात डोनाल्ड ट्रम्प हे एका रॅलीला संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. या हल्ल्यातून ते थोडक्यात वाचले आहेत. १३ जुलैच्या दिवशी संध्याकाळी ६.१५ वाजता हल्ला झाला. या घटनेनंतर तातडीने डोनाल्ड ट्रम्प यांना बाजूला नेण्यात आलं आणि सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आलं. आता डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत काय घडलं? (What happened at Trump rally? )
डोनाल्ड ट्रम्प हे पेनासेल्वेनिया या ठिकाणी ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवर बोलत होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. ही गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली. अशात तातडीने ट्रम्प हे खाली वाकले. त्यानंतर सिक्रेट सर्व्हिसचे सुरक्षा रक्षक त्यांच्या भोवती आले. त्यांच्या भोवती कडं तयार करुन त्यांना या ठिकाणाहून बाजूला करण्यात आलं. त्यानंतर जो हल्लेखोर होता त्यालाही ठार करण्यात आलं. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ट्रम्प यांनी त्याबाबत संवेदना व्यक्त केली आहे.
ट्र्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कोण जबाबदार? (Who is responsible for Trump’s security?)
सिक्रेट सर्व्हिस तर्फे डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा केली जाते. रिपब्लिक पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की आता आम्ही या घटनेची चौकशी करत आहोत. ट्रम्प यांची सभा असताना इमारतीच्या छतावर तो हल्लेखोर पोहचलाच कसा? याचा तपासही आम्ही करत आहोत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार हल्लेखोराने एकाहून अधिक राऊंड फायर केले. डोनाल्ड ट्रम्प हे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. यानंतर सिक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षा रक्षकांसह डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय प्रतिक्रिया दिली? (What Donald Trump Said?)
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडिया साईटवर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले, “सिक्रेट सर्व्हिसने माझा जीव वाचवला, मी त्यांचे आभार मानतो. मी पेनसिल्वेनियाच्या बटलर या ठिकाणी निवडणूक प्रचाराचं भाषण करत होतो. माझ्यावर गोळीबार झाला. माझ्या कानाजवळून काहीतरी गेलं याची मला जाणीव झाली आणि पटकन खाली बसलो. पाहिलं तर रक्त वाहात होतं. बराच रक्तस्त्राव झाला. मात्र तातडीने सिक्रेट सर्व्हिसचे सुरक्षा कर्मचारी आणि अमेरिकेच्या कायदा तयार करणाऱ्या संस्थांचा मी आभारी आहे. मला हल्लेखोर कोण होता ते माहीत नाही. त्याला ठार केल्याचं समजलं आहे. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी चाटून गेली. एक सणक डोक्यात गेली. गोळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर मला कळलं काहीतरी चुकीचं घडलं आहे. रक्त मोठ्या प्रमाणावर गेलं. देवाकडे मी प्रार्थना करतो की अमेरिकेचं रक्षण करावं. तसंच आत्ताचा क्षण असा आहे की आपण सगळ्यांनी या हल्ल्याविरोधात एक होऊन उभं राहिलं पाहिजे.” असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.