अमेरिकेत लोकशाही तत्त्वांवर आधारित निष्पक्ष निवडणुका कार्यक्षमपणे व्हाव्यात यासाठी अध्यक्ष बराक ओबामा यांनी निवडणूक सुधारणा आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाने निवडणूकविषयक शिफारसी ओबामा प्रशासनासमोर सादर करणे अपेक्षित आहे. बॉब ब्युअर आणि बेन गिन्सबर्ग हे या अध्यक्षीय आयोगाच्या अध्यक्षपदी आहेत. गिन्सबर्ग हे २०१२ मधील अध्यक्षीय निवडणुकीत ओबामा यांच्या प्रचार मोहिमेचे प्रमुख होते. या आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
मतदारांना मतदान करताना लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागणार नाही यासाठी काय बदल घडविता येतील याचा विचार या शिफारसींमध्ये करण्यात यावा, असे ओबामा प्रशासनातर्फे आयोगाला स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. निवडणुकींसाठी जगभरात रुळलेल्या सर्वोत्तम पद्धतींचा आढावा घेत त्यातील अमेरिकेच्या मानसिकतेला अनुकूल असणारी पद्धती सुचविण्यासही आयोगाला सांगण्यात आले आहे.
मतदानास पात्र असलेल्या तसेच मतदानाची इच्छा असलेल्या एकाही नागरिकाचा हिरमोड होणार नाही याची काळजी घेण्याची सूचनाही आयोगाची कार्यकक्षा स्पष्ट करताना देण्यात आली आहे. मतदान यंत्रे, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, मतदान केंद्रे, अमेरिकेतील तसेच अमेरिकेबाहेरील मतदारांचे प्रश्न, मतदारांमधील जागृती अशा मुद्दय़ांचा समावेश करण्यात आला आहे.

Story img Loader