इराकमध्ये ‘इस्लामिक स्टेट’च्या दहशतवाद्यांकडून वेढा पडलेल्या अमरिली प्रांतात अमेरिकी लष्कराने नागरिकांना खाद्य; तसेच इतर जीवनावश्यक वस्तू विमानातून टाकल्या. या वेळी शिया तुर्कोमन नागरिकांनी घराबाहेर पडत ही मदत गोळा केली. गेल्या दोन महिन्यांपासून या नागरिकांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत मिळालेली नाही. त्यासाठी मानवीय दृष्टिकोनातून ही मदत देण्यात आल्याचे पेन्टॅगॉनच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि इंग्लंडच्या विमानांतूनही अत्यावश्यक मदतीची पाकिटे या भागांत टाकण्यात आली, असे पेन्टॅगॉनचे माध्यम सचिव जॉन किरबी यांनी सांगितले. नागरिकांना वैद्यकी मदत पुरवतानाच अमरिली भागाला वेढा देऊन बसलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले करण्यात आल्याचे किरबी म्हणाले. यासाठी बराक ओबामा यांची परवानगी घेण्यात आली आहे. माणुसकीच्या दृष्टिकोनातून नागरिकांना अन्न आणि पाणी यांचा पुरवठा करा; तसेच वैद्यकीय मदत पुरवा, असे आदेश ओबामा यांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे किरबी यांनी स्पष्ट केले.
याच वेळी अमरिली भागांत दहशतवाद्यांचे हल्ले रोखण्यासाठीही उपाययोजना हाती घ्या, असेही ओबामा यांनी स्पष्ट केल्याचे ते म्हणाले. इराकमधील काही भागांत केली जाणारी लष्करी कारवाई मर्यादित असेल. दहशतवाद्यांकडून किती नागरिक ओलीस ठेवण्यात आले आहेत वा त्यांच्या जीविताला किती प्रमाणावर धोका आहे, याची व्याप्ती लक्षात घेऊनच अमेरिकन हल्ल्याचे स्वरूप ठरवण्यात येईल, असे किरबी म्हणाले. संपूर्ण इराकमध्ये आजवर एकूण ११५ हवाई हल्ले करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader