दिल्लीत सामूहिक बलात्काराच्या घटनेत मरण पावलेल्या निर्भया( प्रसारमाध्यमांनी दिलेले नाव) या मुलीस आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथे झालेल्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय महिला धैर्य पुरस्कारने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तिच्या कुटुंबातील कुणीही उपस्थित नव्हते. भारताच्या राजदूत निरूपमा राव या वेळी उपस्थित होत्या. इतर आठ महिलांनाही यावेळी ‘धैर्य’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी सांगितले की, तिचे शौर्य व धैर्य हे लाखो स्त्री-पुरूषांना एकच संदेश देऊन एकत्र आणते; तो म्हणजे आता पुन्हा नाही, लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्या व मरण पावलेल्यांना यापुढे सामाजिक कलंकाच्या त्रासातून जावे लागणार नाही.
जॉन केरी यांनी खच्चून भरलेल्या सभागृहातील सर्वाना निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी क्षणभर स्तब्ध उभे राहण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वत:ही तिला श्रद्धांजली वाहिली. केरी म्हणाले की, निर्भया शूर होती. मोठय़ा मनाची होती व निर्भीडही होती. तिच्या लढय़ाने तिला चिरंतन केले. भारतातील महिलांच्या विरोधात होत असलेल्या हिंसाचाराच्या प्रश्नावर एकत्र येण्याची प्रेरणा देशातीलच नव्हे तर जगातील लोकांना दिली. न्यायासाठी तिने प्रचंड धैर्य दाखवले. एवढे धैर्य क्वचितच कुणी दाखवले असेल, आम्ही तिचा मरणोत्तर सन्मान करीत आहोत, असे केरी यांनी या वेळी सांगितले.
निर्भयाने ज्या घटनेला तोंड दिले त्याचे वर्णन करताना केरी यांनी सांगितले की, तेवीस वर्षांची निर्भया गेल्या डिसेंबरमधील त्या दिवशी बसमध्ये बसली, नंतरच्या घटनेत तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला, तिला नंतर मित्रासह बाहेर फेकण्यात आले. ते दोघेही रक्तस्त्राव होत असताना विवस्त्रावस्थेत रस्त्यावर पडून होते, पण तिने जिद्द सोडली नाही. दोन आठवडे तिला तिच्या पाठिंब्यासाठी सुरू झालेल्या आंदोलनाची माहिती कळत होती. जगभरातून व्यक्त झालेला संताप समजत होता,ती जगण्याची लढाई लढत होती; त्याचबरोबर तिने न्यायासाठीही लढा दिला. तिने डॉक्टरांचे सल्ले धुडकावून दोनदा पोलिसांना जबानी दिली, त्यात तिने बलात्काराच्या घटनेची हकीकत कथन केली. गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे अशी इच्छाही तिने बोलून दाखवली होती.
केरी यांनी निर्भयाच्या आईवडिलांनी पाठवलेला संदेश स्वत: वाचून दाखवला. या संदेशात म्हटले आहे की, ‘आज, आमचा जगाला एकच संदेश आहे. तुमच्या सन्मानावर, इज्जत व इभ्रतीवर होणारा हल्ला सहन करू नका, वाईट वागणूक मूकपणे सहन करू नका. पूर्वी स्त्रिया मुकाटपणे सगळे सहन करीत होत्या, लैंगिक गैरवर्तन सहन करीत होत्या. त्या पोलिसांना घडला प्रकार सांगत नव्हत्या. तक्रारी दाखल करीत नव्हत्या, त्यांना सामाजिक कलंकाची भीती वाटत असे. आता हे सगळे बदलले आहे, भीती गेली आहे. तिचा मृत्यू फार भयानक पद्धतीने झाला, पण त्यातून महिलांना व्यवस्था सुधारण्यासाठी एक मोठी शक्ती मिळाली आहे.’
भारतातील नव्हे तर उर्वरित जगातील महिलांनी आता सामाजिक कलंकाची भीती बाळगू नये व यापुढे शांत राहू नये. या घटनेमुळे त्यांच्या मनाला एक खुली वाट मिळाली आहे व त्यांचे सक्षमीकरण झाले आहे. यापुढे कोण काय म्हणेल या कारणास्तव त्या घाबरणार नाहीत. आमची मुलगी एक दिवस सगळ्या जगाची मुलगी होईल असे कधीच वाटले नव्हते. तीच एक मोठी उपलब्धी आहे. ती इतर मुलांपेक्षा वेगळी होती. इतर मुले शाळेत जाताना रडायची, तिच्यात काहीतरी वेगळे होते म्हणून ती शाळेत जायला मिळाले नाही तर रडायची. ती सुखी-समाधानी होती. संघर्षांच्या काळातही ती आनंदी राहिली. आमच्या तीनही मुलांना आम्ही सारखीच वागणूक दिली. ती मुलगी होती म्हणून भेदभाव केला नाही, असे या संदेशात म्हटले आहे.अफगाणिस्तान नॅशनल इंटरडिक्शन युनिटच्या मलालाइ बहादुरी, होंडुराजच्या नॅशनल अॅटोनॉमस युनिव्हर्सिटीच्या ज्युलिटा कॅस्टेलनॉस रेक्टर, नायजेरियातील कॅम्पेन फॉर डेमोक्रसीच्या डॉ. जोसेफाइन ओबियाजुलू ओडुमाकिन, रशियातील मानवी हक्क पत्रकार एलिना मिलाशिना, सोमालियातील एलमन पीस अँड ह्य़ूमन राइटस सेंटरच्या कार्यकारी संचालक फरतुन अदान, चीनमधील तिबेटी ब्लॉगर त्सेरिंग वोसर, सीरियातील मानवी हक्क वकील व स्थानिक समन्वय समितीच्या संस्थापक रझान झेतुनहा, व्हिएतनामच्या ब्लॉगर ता फोंग यांचा या वेळी धैर्य पुरस्काराने सन्मान केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा