US Illegal Immigrants: अमेरिकेतून १०४ बेकायदा भारतीय स्थलांतरितांना घेऊन आलेले अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरच्या श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी दुपारी उतरले. यापैकी ३३ जण हे गुजराती आहेत. हे ३३ जण वैध कागदपत्रांशिवाय अमेरिकेत राहत असल्याचे समजल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच ते अमेरिकेत असल्याबद्दल आपल्याला कसलीही कल्पना नव्हती असेही त्यांनी सांगितले आहे.
अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या निकिता पटेलने आपल्या कुटुंबियांना आपण युरोपमध्ये फिरायला जात असल्याचे सांगितले होते. ती अमेरिकेत राहत असल्याबद्दल तिच्या कुटुंबियांना कसलीही कल्पना नव्हती असे निकीताचे वडील कानुभाई पटेल यांनी सांगितले. इंडिया टु़डेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
“माझ्या मुलीला अमेरिकेहून परत पाठवल्याने आम्हाला धक्का बसला. आम्हाला आशा आहे की ती सुरक्षितपणे परत येईल. ती आम्हाला फक्त युरोपमध्ये राहत असल्याबद्दल बोलली होती आणि तिने अमेरिकेत जाण्याबाबत काहीही सांगितले नव्हते. गुजरातमधील ३३ लोकांना परत पाठवलं जात असल्याबद्दल आम्हाला माध्यमामधून समजलं,” असे पटेल म्हणाले.
कानुभाई पटेल पुढे बोलताना म्हणाले की त्यांची मुलगी महिनाभरापूर्वी व्हिसा घेऊन तिच्या दोन मित्रांसह युपोपमध्ये गेली होती. १५ जानेवारी रोजी त्यांचं अखेरचं बोलणं झालं होतं. एमएसचे शिक्षण घेतल्यानंतर इथं नोकरीची संधी नव्हती, मात्र ती पुढे नेमकं काय करणार याबद्दल आम्हाला कल्पना नव्हती.
बेकायदेशिररित्या अमेरिकेत राहत असलेल्या स्थलांतरितांना परत पाठवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचेही पटेल यावेळी म्हणाले. अमेरिकेत अनेक गुजराती आणि पंजाबी लोक राहतात आणि त्यांना परत पाठवले जाऊ नये असेही मत त्यांनी व्यक्त केले. “बरेच लोक पैसे खर्च करून तिथे जातात. या (बेकायदेशीर स्थलांतरितांच्या कारवाई) मुळे त्यांच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागेल,” असे ते म्हणाले.
गांधीनगर येथील गोहिल कुटुंबातील तीन सदस्यही अमेरिकेहून परत आले आहेत. ज्यामध्ये किरणसिंग गोहिल, त्यांची पत्नी मित्तलबेन आणि मुलगा हेयांश यांचा समावेश आहे. हे सर्वजण एक महिन्यापूर्वी अमेरिकेला गेले होते.
आपल्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला अमेरिकेतून परत पाठवण्यात आल्याचे ऐकून किरणसिंग यांची आई भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी सांगितलं की ते (कुटुंबिय) तिथे कसे गेले याबद्दल त्यांन काहीच कल्पना नाही. त्यांनी सांगितले की, गेल्या १५ दिवसांपासून त्यांचे या तिघांशी बोलणे झाले नव्हते आणि त्यांच्या सुरक्षिततेबद्दल त्या काळजीत होत्या. “गावकऱ्यांनाही माहित नाही की ते युएसला कसे गेले. ते लवकर परत आले तर बरं होईल,” असंही त्या म्हणाल्या.
अमेरिकेतून परत पाठवण्यात आलेल्या ३३ गुजराती व्यक्तींपैकी १२ जण मेहसाणा आणि गांधीनगरमधील आहेत. याशिवाय सुरतमधील चार, अहमदाबादमधील दोन आणि खेडा, वडोदरा आणि पाटण जिल्ह्यातील प्रत्येकी एक जण आहे. गुजरात सरकार या ३३ लोकांवर लक्ष ठेवून आहे आणि ते सर्व गुरुवारी अहमदाबादमध्ये पोहोचू शकतात.
अमृतसरला पोहोचल्यानंतर या सर्व नागरिकांची इमिग्रेशन विभागाकडून संपूर्ण चौकशी केली जाईल, त्यानंतर ३३ जणांना गुजरातला पाठवले जाईल. जर या बे कायदेशीर स्थलांतरितांपैकी कोणाचेही गुन्हेगारी रेकॉर्ड असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सूत्रांकडून सांगिण्यात आले आहे.
१०४ स्थलांतरित परतले
टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून उड्डाण घेतलेले सी-१७ अमेरिकन लष्करी विमान दुपारी १.५९ वाजता अमृतसरमधील श्री गुरु राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. यापूर्वीच्या वृत्तांमध्ये हे लष्करी विमान २०५ बेकायदा स्थलांतरितांना घेऊन येत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार बुधवारी आलेल्या विमानातून १०४ बेकायदा स्थलांतरित परत पाठवण्यात आले या विमानात ७९ पुरुष आणि २५ महिला अशा १०४ जणांचा समावेश आहे.
१०४ बेकायदेशीर स्थलांतरितांपैकी हरियाणा आणि गुजरातमधील प्रत्येकी ३३ जण आहेत, तर ३० जण पंजाबमधील आहेत. प्रत्येकी तीन जण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील आहेत आणि दोन जण चंदीगडमधील आहेत.