दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव आता कमालीचा वाढला आहे. उत्तर कोरियाने युद्धाची भाषा केल्यामुळे आपण दक्षिण कोरियाच्या सातत्याने संपर्कात असून त्यांच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर देण्यासाठी  तयार असल्याचे अमेरिेकेने रविवारी स्पष्ट केले.
उत्तर कोरियाने नेहमीच आक्रमक धोरण अवलंबिले आहे आणि सध्या दक्षिण कोरियासोबत युद्धाची भाषा करीत आहे, याकडे आमचे लक्ष आहे. त्यामुळे आपला मित्र राष्ट्र असलेल्या दक्षिण कोरियाच्या मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या केटलिन हेडन यांनी केले आहे.
उत्तर कोरियाने नुकत्याच दिलेल्या धमकीच्या पाश्र्वभूमीवर आम्ही दक्षिण कोरियाच्या संपर्कात आहोत. तसेच संभाव्य युद्धाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यादृष्टीने रणनीती ठरवण्यात येत असल्याचेही हेडन यांनी स्पष्ट केले. उत्तर कोरियाने शनिवारी युद्धखोरीची भाषा केल्यानंतर अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली.
उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, त्यांचा नेता किम जाँग उन याने शनिवारी आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या अमेरिकेच्या धमकीचे अण्वस्त्रानेच उत्तर देण्यात येईल, असे म्हटले.
याशिवाय आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना क्षेपणास्त्र यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश देऊन त्या योजनेवर स्वाक्षरी केली असून वेळप्रसंगी अमेरिकेच्या लष्करी तळांवर आणि प्रदेशांवर हल्ला करण्यासाठी तयार राहावे, असेही किम जाँग उन यांनी म्हटल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.