गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान आणि चीन या दोन शेजारी देशांबरोबर भारताचे असणारे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दोन्ही देशांकडून सातत्याने सीमाभागात भारताला मनस्ताप देणाऱ्या कारवाया केल्या जात असताना भारताकडूनही याबाबत ठाम आणि निषेधाची भूमिका घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आशियामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी पाकिस्तान आणि चीनकडून सीमाभागात होणाऱ्या कारवाया थांबवण्याची आवश्यकता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्त केली जात आहे. यावर आता थेट अमेरिकेच्या गुप्तचर खात्याकडून इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी अमेरिकेतील गुप्तचर खात्याकडून पाकिस्तान आणि चीनबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. यानुसार आगामी काळात पाकिस्तान आणि चीनकडून भारताला धोका निर्माण होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर भारताकडून त्याचा आक्रमकपणे प्रतिकार केला जाऊ शकतो.
आशियामध्ये तणावपूर्ण वातावरण!
अमेरिकी गुप्तचर विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार, आशियामध्ये भारत, पाकिस्तान आणि चीन या देशांमधील संबंध तणावपूर्ण असून त्यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि चीनकडून उचलण्यात येणाऱ्या पावलांवर भारताकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताकडून चीन आणि पाकिस्तानला लष्करी कारवाईच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिली जाण्यची शक्यताही अमेरिकी गुप्तचर विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
द्विपक्षीय चर्चांच्या फेऱ्या
दरम्यान, भारताच्या चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसह शांतता प्रस्थापित करण्यासाठी द्विपक्षीय चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. २०२०मध्ये गलवान प्रांतात चीनकडून करण्यात आलेल्या आगळिकीनंतर या फेऱ्या वाढल्या आहेत. शिवाय, पाकिस्तानशीही पूर्वापार चालत आलेल्या शत्रुत्वावरही दोन्ही बाजूंनी चर्चेच्या माध्यमातून उत्तर काढण्याचा प्रयत्न चालू असताना पुन्हा संघर्षाची ठिणगी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.