एपी, नोम पेन्ह (कंबोडिया)
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी येथे रविवारी जपान आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांशी चर्चा केली. उत्तर कोरियाकडून अण्वस्त्र हल्ल्याच्या वाढत्या धमक्या, आक्रमक क्षेपणास्त्र प्रक्षेपण तसेच प्रशांत महासागरीय प्रदेशातील देशांबाबत चीन घेत असलेली ठाम व आक्रमक भूमिका आदी मुद्दय़ांवर या वेळी चर्चा झाली. चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्याशी बायडेन यांची सोमवारी चर्चा होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला बायडेन यांनी साधलेल्या या संवादाला महत्त्व आहे.
बायडेन यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. कंबोडियात होत असलेल्या पूर्व आशिया परिषदेदरम्यान या तिन्ही नेत्यांची एकत्र भेट व चर्चा होणार असल्याचे समजते. उत्तर कोरियाने गेल्या काही आठवडय़ात अनेक क्षेपणास्त्रांचे आक्रमक प्रक्षेपण केले आहे. त्यात आंतरखंडीय क्षेपणास्त्राचाही समावेश होता. या क्षेपणास्त्रामुळे उत्तर जपानमध्ये खळबळ उडाली होती. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले होते. येत्या काही आठवडय़ांत उत्तर कोरिया सातवी अणुचाचणी करेल, असा धोक्याचा इशारा जपानने दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले, की उत्तर कोरियाकडून उद्भवलेल्या धोक्यांना अमेरिका, दक्षिण कोरिया व जपान यांनी संयुक्तपणे समर्थ तोंड देण्यासाठी या बैठकांत विचारविनिमय होणार आहे. आम्हाला खरोखरच त्रिपक्षीय सुरक्षा सहकार्य वाढवणे गरजेचे वाटते. उत्तर कोरियाच्या आक्रमक धोरणांमुळे हे तीन देश एकत्र येणे फार महत्त्वाचे आहे. कारण या तिन्ही देशांसमोर समान धोका व आव्हान आहे. त्यामुळे या प्रदेशात शांतता आणि स्थिरतेसाठी तिन्ही देशांनी एकत्र व समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे. अलिकडच्या काही महिन्यांत दोन्ही कोरियांत तणाव वाढला आहे. कारण अमेरिका व दक्षिण कोरियाने संयुक्त लष्करी व हवाई दल सराव सुरू केल्याने शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके आपण करत असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला आहे.
दक्षिण कोरिया-अमेरिकेच्या संयुक्त हवाई सरावात डिसेंबर २०१७ नंतर प्रथमच बॉम्बहल्ला करणारी लढाऊ विमाने कोरियन द्वीपकल्पात तैनात करण्यात आली होती. या सरावात दोन्ही देशांच्या प्रगत ‘एफ-३५’ लढाऊ विमानांसह एकूण २४० लढाऊ विमानांचा समावेश होता. त्याला प्रत्युत्तरादाखल उत्तर कोरियाने आपल्या लढाऊ विमानांची मोठय़ा संख्येने आपल्या हद्दीत उड्डाणे केली. बायडेन प्रशासनाने म्हटले आहे, की त्यांनी उत्तर कोरियाशी आण्विक व क्षेपणास्त्र प्रक्षेपण मोहिमांवर प्रतिबंधाच्या अटींवर वाटाघाटी करण्यासाठी चर्चेचे वारंवार आवाहन केले. परंतु किम जोंग उनच्या सरकारने प्रतिसाद दिला नाही.
‘उत्तर कोरियाला रोखण्याबाबत चीनला आवाहन’
इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या ‘जी २०’ गटाच्या परिषदेदरम्यान चीन व अमेरिकेच्या अध्यक्षांदरम्यान व्यापक द्विपक्षीय बैठक अपेक्षित आहे. त्यात उत्तर कोरियाच्या आक्रमक वर्तनाला आळा घालण्यासाठी चीनने आपले अधिकार वापरण्याचे आग्रही आवाहन जिंनिपग यांना बायडेन यांच्यातर्फे करण्यात येणार आहे, असे बायडेन यांनी सांगितले. ते म्हणाले, की उभयपक्षी गैरसमज वाढू नयेत, यासाठी आपण जिनिपग यांच्याशी नेहमीच रोखठोक व थेट चर्चा केली आहे. आपल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यायचा अथवा नाही, हे अर्थातच सर्वस्वी जिनिपग यांच्यावर अवलंबून आहे. सुलिव्हन यांनी शनिवारी यासदंर्भात बोलताना सांगितले होते, की चीनला उत्तर कोरियाच्या गैरप्रवृत्तींना आवर घालण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावण्यात स्वारस्य आहे.