Badar Khan Suri Latest News : पॅलिस्टिनी दहशतवादी संघटना हमासशी संबंध असल्याच्या आरोपानंतर अमेरिकेत भारतीय विद्यार्थी बदर खान सुरी याला ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर अमेरिकेतील एका न्यायाधीशांनी या विद्यार्थ्याला देशातून हद्दपार करण्यास मनाई केली आहे. जॉर्जटाऊन विद्यापीठात शिक्षण घेणारा भारतीय विद्यार्थी सुरी याला देशाबाहेर न काढण्याचा तात्पुरता आदेश व्हर्जिनियातील अलेक्झांड्रिया येथील अमेरिकन जिल्हा न्यायाधीश पेट्रीसिया गिल्स यांनी जारी केला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, हा आदेश कोर्टाच्या पुढील सुनावणीपर्यंत कायम राहाणार आहे.
होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंट (DHS)ने असाही आरोप केला आहे की, जॉर्जटाऊन विद्यापीठाच्या एडमंड ए. वाल्श स्कूल ऑफ फॉरेन सर्व्हिस येथे पोस्टडॉक्टरल फेलो असलेला सुरी याला लुईझियाना येथे ताब्यात घेण्यात आले. तसेच सुरीने सोशल मीडियावर हमास प्रोपगंडा आणि अँटिसेमिटिझनम (antisemitism) पसरवला, ज्यामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला धोका निर्माण झाला.
सुरी याच्या वकीलाने न्यायलयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सुरी यांच्या वकीलाने यापूर्वी सांगितले होते की सुरी यांना त्यांच्या पॅलेस्टिनी समर्थक विचारांमुळे आणि त्यांची पत्नी मूळची पॅलेस्टिनी असल्याने सुरी यांना लक्ष्य केले जात आहे. दरम्यान अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज यूनियन यांनी देखील सुरी याचा बचाव केला आहे. सुरी याला लुईझियानातील अलेक्झांड्रिया येथे हलवण्यापूर्वी अनेक इमिग्रेशन डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बदर खान सुरी कोण आहे?
भारतात जन्मलेले सुरी याने २०२० मध्ये नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियाच्या नेल्सन मंडेला सेंटर फॉर पीस अँड कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन येथे पीस अँड कॉन्फ्लिक्ट स्टडीज या विषयात पीएचडी पूर्ण केली आहे. त्याचा डॉक्टोरल थेसिस हा ट्रान्जिशनल डेमोक्रेसी, डिव्हायडेड सोसायटीज अँड प्रोस्पेक्ट फॉर पीस : ए स्टेट बिल्डिंग इन अफगाणिस्तान अँड इराक हा असून यामध्ये संघर्षग्रस्त देशांमध्ये लोकशाहीची उभरणी यासंबंधी अभ्यास करण्यात आला आहे.
सुरी याने संघर्षग्रस्त पाकिस्तान, बलोचिस्तान, इराण, तु्र्की, सिरीया, लेबनॉन, इजिप्त आणि पेलेस्टिन यासारख्या भागांता सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदु हा धर्म, हिंसाचार, शांतता आणि आणि वांशिक संघर्ष या विषयांवर केंद्रीत आहे.
सुरी हा अमेरिकेत विद्यार्थी व्हिसावर शिक्षण घेत आहे आणि त्याचे लग्न गाझा येथे जन्मलेल्या अमेरिकन नागरिक असलेल्या महिलेशी झाले आहे. त्याची पत्नी माफेज सालेह हिने गाझा इस्लामिक विद्यापीठातून पत्रकारितेत पदवी आणि नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया येथून पदव्युत्तर पदवी घेतली आहे.