व्हिसा गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या अमेरिकेतील भारताच्या उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांनी हे प्रकरण आरोपनिश्चिती करून न्यायप्रविष्ठ करण्याचा कालावधी वाढवण्यासंदर्भात केलेली याचिका अमेरिकी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी १३ जानेवारी रोजीच होणार आहे.
खोब्रागडे यांना व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी अमेरिकेत १२ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.  महिनाभरात हे प्रकरण सुनावणीसाठी न्यायालयात यावे असा नियम असल्याने १३ जानेवारी रोजी यासंदर्भातील खटल्याची पहिली सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र खोब्रागडे यांनी आपल्याला यासाठी आणखी वेळ हवा, अशी विनंती न्यायालयाला केली होती. मात्र त्यासाठी त्यांनी ठोस कारण दिले नाही, असे सांगत न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली. या प्रकरणी १३ जानेवारी रोजी सुनावणी होणारच असून, त्यासाठी खोब्रागडे यांनी न्यायालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे आदेश न्यायालयाने बुधवारी काढले.
‘‘खोब्रागडे यांच्याविरोधातील सुनावणी टाळण्यासाठी कायद्यानुसार या पर्यायाचा आम्ही वापर केला. मात्र न्यायालयाने आमची याचिका फेटाळली. आम्ही अन्य पर्याय वापरता येईल काय, याचा विचार करणार आहोत,’’ असे खोब्रागडे यांचे वकील डॅनियल अर्शाक यांनी सांगितले.
सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यासाठी पुन्हा एकदा खोब्रागडे यांच्याकडून याचिका अर्ज केला जाऊ शकतो, असे समजते.
अमेरिकेचे अ‍ॅटर्नी प्रीत भरारा यांच्या कार्यालयाने खोब्रागडे यांनी यासंदर्भात याचिका केल्याची माहिती उघड केली होती. ‘‘या प्रकरणी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असून, यासंदर्भात जाहीर वाच्यता करू नये, असे दोन्ही बाजूने मान्य करण्यात आले होते. मात्र तरीही भरारा यांनी माहिती उघड करून या कराराचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी,’’ अशी माहिती अर्शाक यांनी केली.

अमेरिकेच्या ऊर्जामंत्र्यांकडून भारताचा दौरा रद्द
अमेरिकेतील भारताच्या उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेतनंतर दोन्ही देशांमधील परराष्ट्रीय संबंध ताणले गेले असतानाच अमेरिकेच्या ऊर्जामंत्री एर्नेस्ट मोनिज यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे.
ऊर्जाविषयक चर्चा करण्यासाठी आणि भारताशी यासंबंधात काही करार करण्यासाठी मोनिज या आठवडय़ात भारतात येणार होते. अमेरिका व भारत या देशांमध्ये ऊर्जा सहकार्य निर्माण व्हावे आणि अमेरिकेकडून भारताला नैसर्गिक वायूची निर्यात करण्याबाबत महत्त्वपूर्ण करार यासंदर्भात मोनिज भारताच्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा करणार होते. मात्र त्यांचा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते जेन प्सकी यांनी सांगितले.  
सध्या हा दौरा रद्द करण्यात आला असला, तरी तो कायमचा रद्द झालेला नाही. आगामी काळात ऊर्जाविषयक महत्त्वपूर्ण मुद्दय़ांवर उभय देशांमध्ये नक्कीच चर्चा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेविरोधात कडक धोरण 
देवयानी यांच्या झडतीची चित्रफीत बनावट – हार्फ

Story img Loader