व्हिसा गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या अमेरिकेतील भारताच्या उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांनी हे प्रकरण आरोपनिश्चिती करून न्यायप्रविष्ठ करण्याचा कालावधी वाढवण्यासंदर्भात केलेली याचिका अमेरिकी न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी १३ जानेवारी रोजीच होणार आहे.
खोब्रागडे यांना व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी अमेरिकेत १२ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. महिनाभरात हे प्रकरण सुनावणीसाठी न्यायालयात यावे असा नियम असल्याने १३ जानेवारी रोजी यासंदर्भातील खटल्याची पहिली सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र खोब्रागडे यांनी आपल्याला यासाठी आणखी वेळ हवा, अशी विनंती न्यायालयाला केली होती. मात्र त्यासाठी त्यांनी ठोस कारण दिले नाही, असे सांगत न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली. या प्रकरणी १३ जानेवारी रोजी सुनावणी होणारच असून, त्यासाठी खोब्रागडे यांनी न्यायालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे आदेश न्यायालयाने बुधवारी काढले.
‘‘खोब्रागडे यांच्याविरोधातील सुनावणी टाळण्यासाठी कायद्यानुसार या पर्यायाचा आम्ही वापर केला. मात्र न्यायालयाने आमची याचिका फेटाळली. आम्ही अन्य पर्याय वापरता येईल काय, याचा विचार करणार आहोत,’’ असे खोब्रागडे यांचे वकील डॅनियल अर्शाक यांनी सांगितले.
सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यासाठी पुन्हा एकदा खोब्रागडे यांच्याकडून याचिका अर्ज केला जाऊ शकतो, असे समजते.
अमेरिकेचे अॅटर्नी प्रीत भरारा यांच्या कार्यालयाने खोब्रागडे यांनी यासंदर्भात याचिका केल्याची माहिती उघड केली होती. ‘‘या प्रकरणी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असून, यासंदर्भात जाहीर वाच्यता करू नये, असे दोन्ही बाजूने मान्य करण्यात आले होते. मात्र तरीही भरारा यांनी माहिती उघड करून या कराराचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी,’’ अशी माहिती अर्शाक यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा