US attack on Yemen: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी लाल समुद्रातील जहाजांवर झालेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. इराणचा पाठिंबा असलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेकडून लष्करी कारवाई करण्यात आली. लष्कराने केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये जवळपास २० जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. लाल समुद्रातील जहाजांवर यापुढे हल्ला केला, तर तुमची अवस्था नरकापेक्षाही वाईट होईल, असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तसेच त्यांनी इराणलाही इशारा दिला असून हुथी बंडखोरांना पाठिंबा देऊ नका, असे सुनावले आहे. जर इराणने अमेरिकेच्या विरोधात काही कारवाई केली तर अमेरिका याचे सडेतोड उत्तर देईल, असेही ट्रम्प यांनी सांगितले.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्कराला हवाई हल्ला करण्याचा आदेश दिला. जोपर्यंत इराणचा पाठिंबा असलेले हुथी बंडखोर लाल समुद्रातील जहाजांवरील हल्ले बंद करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्याविरोधात जोरदार हल्ला सुरूच राहणार, असे त्यांनी जाहिर केले.
ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, आमचे शूर सैनिक अमेरिकेच्या शिपिंग, हवाई दल आणि नौदलाच्या संपत्तीची रक्षा करण्यासाठी हवाई हल्ले करत आहेत. जहाजांची यातायात सुरक्षित वातावरणात व्हावी आणि दहशतवाद्यांच्या तळांना, त्यांच्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी हे हल्ले केले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, जगातील कोणतीही दहशतवादी संघटना अमेरिकेच्या वाणिज्य आणि नौदलाच्या जहाजांचा जलमार्ग अडवू शकत नाही.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हुथी बंडखोरांनीही निवेदन जाहिर केले आहे. या हल्ल्याला आमच्याकडूनही प्रतिसाद दिला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. अल-मसिराह वाहिनीवर बंडखोरांच्या राजकीय प्रवक्त्याने म्हटले की, अमेरिकेच्याया आक्रमकतेला आमच्याकडूनही योग्य उत्तर दिले जाईल. आमचे येमेनी सशस्त्र दलाचे सैनिक या हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.
इराणलाही इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी यानिमित्ताने इराणलाही इशारा दिला आहे. या बंडखोरांना पाठिंबा देणे इराणने तात्काळ थांबवावे. इराण समर्थक असलेल्या हुथी बंडखोरांनी दशकभरापासून येमेनच्या अनेक भागांवर ताबा मिळविला असून ते इस्रायल आणि अमेरिकेचा विरोध करतात. इस्रायलने गाझामध्ये हल्ला केल्यानंतर हुथी बंडखोरांनी लाल समुद्र आणि एडनच्या आखातात अनेक जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. पॅलेस्टाईनवर होणाऱ्या इस्रायली हल्ल्याचा त्यांनी निषेध नोंदविला होता.
हूथी बंडखोर कोण आहेत?
इराणने आखातामध्ये तयार केलेल्या ‘विद्रोहाच्या अक्षा’चा (अॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स) सदस्य असलेली हूथी ही येमेनी अतिरेकी संघटना आहे. त्यांना इराणकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळय़ासह ड्रोनसारख्या आधुनिक युद्धसाहित्याचा पुरवठा होतो. याच्या जोरावर राजधानीच्या सना शहरासह बहुतांश उत्तर येमेन २०१४ पासून हूथींच्या नियंत्रणाखाली आहे. सौदी अरेबिया व अमेरिकेच्या विरोधातील ही संघटना अर्थातच इस्रायलचाही तिरस्कार करते.
‘अक्षा’चा भाग असलेल्या हमासविरोधात इस्रायलचे युद्ध सुरू असल्यामुळे हूथी अधिक आक्रमक झाले. त्यामुळेच गेल्या काही आठवडय़ांत लाल समुद्रातील अमेरिका, युरोपची जहाजे लक्ष्य केली जात आहेत. यासाठी ड्रोन किंवा जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर केला जात आहे. जहाजाच्या कप्तानांना रेडिओद्वारे मार्ग बदलण्यासाठी धमकावले जात आहे. परिणामी अनेक मोठय़ा मालवाहू कंपन्यांनी लाल समुद्राचा मार्ग टाळण्याचा निर्णय घेतला आहे.