अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील कायद्याच्या प्राध्यापक एमी वॅक्स यांनी स्थलांतरीत भारतीयांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. स्थलांतरीत भारतीय स्वतःचा देश दलदल असताना अमेरिकेतील प्रत्येक गोष्टीवर टीका का करतात, असं वक्तव्य प्राध्यापक एमी वॅक्स यांनी केलंय. त्या फॉक्स नेशन या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एमी वॅक्स म्हणाल्या, “आशियातील लोक वर्णभेदासाठी अमेरिकेला जबाबदार धरतात, जसं काही अमेरिका वाईट लोकांचा देश आहे. ते अमेरिकेचा द्वेष करतात. सर्वच स्थलांतरीत असे आहेत असं मला म्हणायचं नाही. विविधता, वर्णभेद, वैद्यकीय क्षेत्रातील वर्णभेद या विषयांवरील कार्यक्रमांचं नेतृत्व कोण करतं आहे ते आपण पाहू शकतो. हे सर्व आशियातील लोक आहेत. ते अशा देशातून येतात जिथं जातीभेद आहे. तेथे अमेरिकेपेक्षा वाईट स्थिती आहे आणि तेच अमेरिकेला नाव ठेवत आहेत.”

“भारतातून आलेली ब्राह्मण महिलेचं उदाहरण पाहा. ब्राह्मण महिला भारतातून अमेरिकेत येतात आणि चांगलं शिक्षण घेतात. अमेरिका त्यांना संधी देते. यानंतरही ते अमेरिकेला वर्णभेदी म्हणतात. इथंच अडचण आहे. त्यांना ते ब्राह्मण असल्याने इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ असल्याचं शिकवलं जातं आणि तरीही त्यांचा देश काही प्रमाणात दलदल आहे. त्यांना त्यांचा देश हव्या तशी संधी देत नाही,” असं मत एमी वॅक्स यांनी व्यक्त केलं.

“अनेक घटनांमध्ये त्यांना ज्या संधी मिळायला हव्यात तशा खरंच मिळत नाहीत. ते अमेरिकेत येतात. त्यांना दिसतं की या संधी अमेरिकेत आहेत. अमेरिकेत विकसित वैद्यकीय संस्था आहेत. मला काही लोकांना विचारावं वाटतं की मग तुम्ही तुमचा देश का सोडला, तुम्ही का अमेरिकेत आलात?” असा सवाल एमी वॅक्स यांनी विचारला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us law professor amy wax controversial statement on indian asian immigrant pbs