सतत जगातील उठाठेवींच्या चिंतेत असलेल्या अमेरिकेला नैसर्गिक संकटाने अक्षरश गोठवले आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर अमेरिकेला ध्रुवीय वादळाने तडाखा दिला असून संपूर्ण उत्तर अमेरिकेत जणून हिमयुगच अवतरले आहे. पारा उणे ५२ अंश सेल्सिअस एवढय़ा नीचांकी पातळीपर्यंत घसरला असून ‘शतकातील सर्वात थंड तापमान’ म्हणून त्याची नोंद हवामानशास्त्रज्ञांना घ्यावी लागणार आहे. ध्रुवीय वादळ आता मध्य अमेरिकेच्या दिशेने सरकू लागले आहे. त्यामुळे कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
शिकागोपासून इंडियानापोलिस, अलाबामापर्यंत व पुढे कॅनडातील काही भाग अशा संपूर्ण उत्तर अमेरिकेला ध्रुवीय वादळाचा तडाखा बसला आहे. या पट्टय़ातील सर्वच शहर व ग्रामीण भागाचा शब्दश बर्फ झाला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधित राज्यातील प्रशासनांना युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागत आहेत. शिकागोमध्ये तर उणे २७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. इंडियानापोलिस राज्यातील फोर्ट वायने येथे उणे २५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ओक्लाहोमा व टेक्सास या राज्यांत बोचरे वारे वाहत असून तेथेही पाऱ्याने तळ गाठला आहे.
इंधन-विजेवर परिणाम
एकीकडे कोटय़वधी नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत असतानाच दुसरीकडे देशातील सर्व महत्त्वाचे व्यवहार शब्दश थंडावले आहेत. इंधनच गोठल्यामुळे हजारो विमानोड्डाणे रद्द करण्यात आली. इंधनाच्या उत्पादनावरही या थंडीचा परिणाम झाला असून काही दिवस तरी हे उत्पादन ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. थंडीमुळे वीजपुरवठय़ावर परिणाम झाला असून अनेक राज्यांत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.
इलिनॉइस-इंडियानात आणीबाणी
थंडीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे इलिनॉइस आणि इंडियानापोलिस या राज्यांनी आणिबाणी जाहीर केली आहे. आणिबाणीमुळे या राज्यांना आता मध्यवर्ती सरकारची मदत मिळू शकणार आहे. ओहायोतही ध्रवीय वादळाचा तडाखा वाढल्याने आणिबाणीसदृष परिस्थिती निर्माण झाली आहे.

ध्रुवीय वादळाचा फटका १८ कोटी नागरिकांना बसला आहे. या थंडीत चौघांचा मृत्यू झाला असून त्यात एका लहान मुलाचा समावेश आहे. लोकांनी घराबाहेर पडूच नये, काळजी न घेतल्यास कोणाचाही दहा मिनिटांत मृत्यू होऊ शकतो एवढी गंभीर परिस्थिती असल्याचे इंडियानापोलिसचे महापौर ग्रेग बॅलार्ड यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, बेघरांना आसरा मिळावा यासाठी संबंधित राज्य सरकारांनी हंगामी निवाऱ्याची व्यवस्था निर्माण केली आहे.