अमेरिकेने चीनविरोधात मोठय़ा प्रमाणात हॅकिंग हल्ले केले आहेत, त्यात अनेक टेक्स्ट संदेश चोरण्यात आले, असा खळबळजनक दावा सीआयएचा माजी कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याने केला आहे. अमेरिकेच्या टेहळणी कार्यक्रमाचे भांडाफोड स्नोडेन याने केले होते. दरम्यान यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमेरिका हा सायबर हेरगिरीतील मोठा खलनायक असल्याचे म्हटले आहे.
अलीकडे केलेल्या दाव्यात त्याने ‘साउथ चायन मॉर्निग पोस्ट’ या वृत्तपत्राला असे सांगितले, की अमेरिकी सरकारने चिनी मोबाइल फोन कंपन्यांचे हॅकिंग करून लाखो टेक्स्ट संदेश चोरले आहेत. दरम्यान स्नोडेन याने असेही म्हटले आहे, की आपण चीनचे प्रशासन असलेल्या हाँगकाँगमधून बाहेर पडून आपण रशियाला जाणार आहोत व तेथून आणखी तिसऱ्याच ठिकाणी जाऊ.
चीनमध्ये टेक्स्ट संदेश हे संदेशवहनाचे एक मोठे साधन आहे. अनेक सामान्य लोक त्याचा वापर करतात. सरकारी अधिकारीही ते वापरतात, त्याच्या माध्यमातून चॅटिंगही केले जाते.
सरकारी आकडेवारीनुसार चीनमध्ये २०१२ मध्ये ९०० अब्ज टेक्स्ट संदेश वापरले गेले. जी संख्या पूर्वीच्या वर्षांपेक्षा २.१ टक्क्य़ांनी जास्त आहे.
स्नोडेन याने असा दावा केला आहे, की चीनच्या अतिशय प्रतिष्ठित अशा तिंगशुआ विद्यापीठाला अमेरिकेने हॅकिंगचे लक्ष्य केले होते. चीनमधील अनेक संशोधन प्रकल्प या विद्यापीठात चालतात. तेथे अमेरिकेच्या एनएसए म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने हल्ले केले होते. अगदी अलीकडचा हल्ला जानेवारीत झाला होता. जानेवारीत एका दिवसात या विद्यापीठाचे ६३ संगणक व सव्‍‌र्हर हॅक करण्यात आले होते.
स्नोडेन हा चीनचा हेर असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. दरम्यान स्नोडेन याने सांगितले, की संगणकाचे हॅकिंग केल्याशिवाय इंटरनेट प्रोटोकॉल पत्ते मिळवता येत नाहीत व नेमके या विद्यापीठाच्या बाबतीत ते पत्ते एनएसएकडे आहे, त्यामुळे त्यांनी तिंगशुआ विद्यापीठातील संगणकाचे हॅकिंग केले हे स्पष्ट होते.
दरम्यान स्नोडेन याने केलेल्या या आरोपावर चीनने असे म्हटले आहे, की अमेरिका हा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात हेरगिरी करणारा मोठा खलनायक आहे. आताचे आरोप व पूर्वीच्या काही घटना यातून अमेरिका हाच मोठा खलनायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान स्नोडेन याने केलेल्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर सायबर सुरक्षेच्या संदर्भातील राजनैतिक बाबींसाठी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक खास कार्यालय सुरू केले
आहे.

Story img Loader