दक्षिण सुदानमध्ये हिंसाचार सुरूच असून तेथे अमेरिकेने ४६ अतिरिक्त लष्करी जवान पाठवले, परंतु त्यांचे विमान तोफगोळ्यांच्या माऱ्यात सापडल्याने त्यांना ही मोहीम सोडून माघारी यावे लागले.
हिंसाचारग्रस्त असलेल्या या देशात आमच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी लष्करी कारवाई करण्याची गरज आहे, असे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिले आहेत.
दरम्यान, दक्षिण सुदानमध्ये सरकारी दलांनी बंडखोरांवर हल्ले सुरूच ठेवले असून तेथे जोरदार यादवी संघर्ष सुरू आहे. अध्यक्ष साल्वा कीर यांनी या हिंसाचारास अगोदर मंत्रिमंडळातून काढलेले माजी उपपंतप्रधान रीक माशर हे जबाबदार असल्याचा आरोप केला असून त्यांनी हा आरोप फेटाळला आहे.
व्हाइट हाऊसने काँग्रेसला सादर केलेल्या निवेदनात ओबामा म्हणतात की, दक्षिण सुदानमधील परिस्थिती पाहता तेथील अमेरिकी नागरिक, राजदूत यांना धोका आहे. त्यामुळे तेथे आणखी सैनिक पाठवण्याबरोबरच लष्करी कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
२१ डिसेंबरला अमेरिकेचे एक लष्करी विमान त्यांच्या सैनिकांना घेऊन दक्षिण सुदानकडे रवाना झाले. आता हे सैनिक अमेरिकी नागरिक व राजदूतावासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुटका करतील. दरम्यान हे विमान बोरकडे येत असताना मोठय़ा प्रमाणावर तोफगोळ्यांच्या माऱ्यात सापडले.
अमेरिकी नागरिकांना सोडवण्याची ही मोहीम अर्धवट सोडून हे विमान परतले. ओबामा यांनी असे म्हटले आहे की, अमेरिकी नागरिकांचे व त्यांच्या मालमत्तांचे रक्षण करणे एवढाच या मोहिमेचा हेतू होता. दरम्यान ओबामा ख्रिसमसच्या सुटीवर असून त्यांना दक्षिण सुदानमधील परिस्थिती कशी चिघळत चालली आहे याची माहिती देण्यात आली.
अमेरिकेच्या संरक्षण सल्लागार सुसान राइस यांनी त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी व दक्षिण सुदानची राजधानी जुबामधील अमेरिकी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
अमेरिका व मित्र देशांच्या नागरिकांना जुबा येथून बोर शहरात आणण्याचे काम अमेरिका व संयुक्त राष्ट्रांच्या विमानांनी केले, असे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्तया जेन साकी यांनी सांगितले.
अमेरिकेने आतापर्यंत त्यांच्या ३८० नागरिक व अधिकाऱ्यांची सुटका केली असून इतर देशातील ३०० नागरिकांची सुटका केली आहे. त्यांना नैरोबीत हलवले असून दक्षिण सुदानच्या बाहेरील काही भागात अमेरिकेची चार विमाने व पाच लष्करी हेलिकॉप्टर्स नागरिकांना सोडवण्यास सज्ज आहेत.
दक्षिण सुदानमध्ये लष्करी कारवाईचे ओबामा यांचे संकेत
दक्षिण सुदानमध्ये हिंसाचार सुरूच असून तेथे अमेरिकेने ४६ अतिरिक्त लष्करी जवान पाठवले, परंतु त्यांचे विमान तोफगोळ्यांच्या माऱ्यात सापडल्याने त्यांना ही मोहीम सोडून माघारी यावे लागले.

First published on: 24-12-2013 at 02:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us may take further military action in south sudan barack obama