US Nail Salon Worker arrested for having 13 Remote IT Jobs : एक व्यक्ती तब्बल १३ आयटी कंपन्यांसाठी काम करत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. इतकेच नाही तर यामागील चीनचे कनेक्शन देखील समोर आले आहे. दरम्यान याप्रकरणी अमेरिकेत नेल सैलून (Nail Salon) मध्ये काम करणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याला या प्रकरणात किमान २० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. २०२१ आणि २०२४ च्या दरम्यान वेगवेगळ्या अमेरिकन आयटी कंपन्यांमध्ये १३ रिमोट जॉब्स मिळवण्यासाठी चीनी व्यक्तीबरोबर मिळून काम केल्याचा या कामगारावर आरोप आहे.
या नोकर्यांमधून मिन्ह फुओंग न्गोक वोंग (Minh Phuong Ngoc Vong) याला हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे काम करण्यासाठी ९७०,००० डॉलर म्हणजेच सुमारे ८ कोटी रुपये पगार मिळाला. विशेष बाब म्हणजे हे काम प्रत्यक्षात मात्र एका नॉर्थ कोरियाच्या ऑपरेटीव्हने चीनमध्ये बसून केल्याचा संशय आहे, यासंबंधीचे वृत्त फॉर्च्यूनने दिले आहे.
अमेरिकेच्या जस्टीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यापैकी काही आयटी जॉब्समध्ये फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनसारख्या सरकारी एजन्सींना दिलेल्या सॉफ्टवेअर सर्व्हिसेसच्या कंत्राटाचाही समावेश होता. चीनमधील डेव्हलपर्सनी या नोकर्यांचा वापर अत्यंत संवेदनशील सरकारी प्रणालींमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी केला, ज्यामध्ये त्यांनी परदेशात बसून लॉग इन केले, असे अधिकार्यांनी सांगितले. त्यांनी माहिती दिली की, वोंग हा एका मोठ्या घोटाळ्यात भाग होता, ज्यामध्ये प्रशिक्षण घेतलेले नॉर्थ कोरियन नागरिक अमेरिकेतली कंपन्यांबरोबर काम करतात. ज्यामध्ये ते वेगळी ओळख दाखवून रिमोट-वर्क आयटी जॉब्स मिळवतात आणि रशिया किंवा चीनमधून काम करतात, त्यानंतर त्यांना मिळालेला पगार उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांना पाठवतात.
वोंग याच्याबद्दल सांगायचे झाल्यास, अमेरिकन यत्राणांचे म्हणणे आहे की तो चीनमधील डेव्हलपर्सबरोबर मिळून काम करत होता, ज्यामद्ये विल्यम जेम्स नावाच्या व्यक्तीचा देखील समावेश आहे जो की नॉर्थ कोरियाचा नागरिक असल्याचा संशय आहे, असे फॉर्च्यूनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान चौकशीदरम्यान वोंगने एफबीआय एजंट्सना सांगितले की ‘विल्यम’ने सेल फोन व्हिडिओ गेम अॅपद्वारे त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला सांगितले की तो डेव्हलपमेंट कामे मिळवून आणि नंतर विल्यमला त्याच्या कंप्यूटरचा अॅक्सेस देऊन कायदेशीररित्या पैसे कमवू शकतो.
तपास यंत्रणांना आढळून आले आहे की, वोंगने जेम्स आणि इतर ऑपरेटीव्हजना त्याचा फेक रिज्यूमे बनवू दिला, ज्यामध्ये वोंग हा सॉफ्टवेअर डेव्हलपर असून त्याला १६ वर्षांचा अनुभव आहे आणि त्याच्याकडे हवाई विद्यापीठाची पदवी असा दावा करण्यात आला होता. या रिज्यूमेमध्ये वोंग याला सेक्रिट-लेव्हल सिक्युरिटी क्लिअरन्स असल्याचेही म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र वोंगकडे कोणतीही पदवी नाही, तसेच त्याच्याकडे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा कोणताही अनुभव देखील नाही.
असा उघड झाला प्रकार
वोंग काम करत असलेल्या १३ कंपन्यांपैकी एका कंपनीला ऑनलाइन मुलाखतीदरम्यान घेतलेला वोंगचा स्क्रीनशॉट अंतिम मुलाखतीनंतर घेतलेल्या दुसऱ्या स्क्रीनशॉटशी जुळत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर वोंगला त्याची ओळख पटविण्यासाठी त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि यूएस पासपोर्ट दाखवण्यास सांगण्यात आले तेव्हा ही सर्व फसवणूक उजेडात आली.