अमेरिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, २०१६ मधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन आणि सीएनएन वृत्तवाहिनीला टपालाद्वारे पाठवण्यात आलेल्या स्फोटकांप्रकरणी तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. सिजर सेयॉक ज्युनिअर या संशयिताला तपास यंत्रणांनी अटक केली असून तो रिपब्लिकन पक्षाचा कट्टर समर्थक असल्याचे समजते. त्याच्या घरातील एका कारमध्ये ट्रम्प यांचे समर्थन करणारे स्टिकर्सही सापडले आहेत. त्याची कसून चौकशी सुरु आहे.
बुधवारी अमेरिकेत महत्त्वाच्या व्यक्तींना टपालाद्धारे स्फोटकं पाठवल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. बराक ओबामा यांच्या वॉशिंग्टन येथील कार्यालयात, हिलरी क्लिंटन आणि बिल क्लिंटन यांच्या न्यूयॉर्कमधील निवासस्थानी आणि न्यूयॉर्कमधील सीएनएन या वृत्तवाहिनीच्या कार्यालयात ही स्फोटकं पाठवण्यात आली होती. या स्फोटकांप्रकरणी अमेरिकेतील तपास यंत्रणांनी तपासाला सुरुवात केली होती.
तपास यंत्रणांनी फ्लोरिडा येथून सिजर सेयॉक ज्युनिअर याला अटक केली आहे. सिजर सेयॉक याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर चोरी, अमलीपदार्थ बाळगणे आणि फसवणूक यासारखे गुन्हे दाखल आहेत. तसेय बॉम्बचा वापर करण्याची धमकी दिल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल होता, असे समजते. २०१५ मध्ये त्याला शेवटची अटक झाली होती. संशयित हा मूळचा न्यूयॉर्कचा आहे. संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजताच राष्ट्रायध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तपास यंत्रणांचे कौतुक केले आहे.