US Plane Crash Viral Video : अमेरिकेतली फिलाडेल्फिया येथील उपनगरात विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी अगदी वर्दळीच्या भागात झालेल्या या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक घरांना आग लागली. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास रुझवेल्ट मॉलजवळ मेडिकल ट्रान्सपोर्ट जेट कोसळले.

हे विमान एका तरुण रुग्णाला घेऊन जात होते, तसेच त्याच्याबरोबर विमानात ४ क्रू मेंबर देखील होते अशी माहिती जेट रेस्क्यू एअर अँब्युलन्सने दिली आहे. ही घटना घडल्यानंतर घरांना लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर तात्काळ आपत्कालीन बचाव पथकांनी मदतकार्य केले.

घटनेचे व्हिडीओ व्हायरल

दरम्यान विमान कोसळल्यानंतर सोशल मीडियावर या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दरवाजावरील डोअरबेल कॅमेऱ्यामध्ये अनेक घरांना लागलेल्या आगीचे दृश्य कैद झाले आहेत.

कारमधील डॅशकॅमेऱ्यात विमान कोसळतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे. या व्हिडीओमध्ये विमानाचा भीषण स्फोट झाल्याचे, तसेच जवळपासच्या भागाला आग लागल्याचे दिसून येत आहे.

तर दुसर्‍या एका व्हिडीओत आगीचा गोळा कोसळताना दिसत आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसरात उजेड पडल्याचे दिसत आहे. पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या अपघाताबद्दल माहिती दिली आहे.

वॉशिंग्टनच्या रेगन राष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघाताच्या अवघ्या दोन दिवसांनंतर ही घडली आहे. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या अपघातातएक प्रवासी जेट आणि एक लष्करी हेलिकॉप्टर यांच्यात धडक झाली होती ज्यामध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला होता. जवळजवळ २५ वर्षांतील अमेरिकेत घडलेली ही सर्वात मोठी विमान दुर्घटना होती.

Story img Loader