द्विपक्षीय सुरक्षा करारावर स्वाक्षरी करण्याच्या मुद्दय़ावरून अमेरिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिढा वाढतच आहे.
अफगाणिस्तानने या सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली नाही तर यावर्षांअखेर अमेरिका आपले सर्व सैन्य युद्धाने होरपळलेल्या अफगाणिस्तानातून काढून घेईल, असा इशारा अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे.
२०१४ नंतर अमेरिकी सैनिकांना अफगाणिस्तानमध्ये परवानगी देण्याबाबतच्या द्विपक्षीय सुरक्षा करारावर अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमिद करजाई यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यामुळे ओबामा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मंगळवारी दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवरून याबाबत चर्चा केली होती.
सुरक्षा करारानुसार अमेरिकेचे काही सैनिक अफगाणिस्तानात राहून अल कायदाच्या दहशतवादी कारवायांविरोधात मोहीम राबवतील आणि अफगाणिस्तानच्या फौजांना प्रशिक्षण देतील, असे अमेरिकेचे धोरण आहे. मात्र अफगाणिस्तानचे अध्यक्ष करजाई यांचा त्यास विरोध आहे.
दरम्यान, अमेरिकेवरील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर २००१ पासून अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात तळ ठोकून आहे. मात्र सध्या अफगाणिस्तानात परिस्थिती निवळत असून नव्या बदलांचे ओबामा यांनी स्वागत केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा