अमेरिकेत शुक्रवारी अ‍ॅडम लांझा या २० वर्षीय माथेफिरूने एका शाळेत केलेल्या गोळीबारात २० चिमुरडय़ांसह २६ जणांचे प्राण घेतले त्याच दिवशी ओक्लाहोमा येथील एका शाळेत एका तरुणाकडून होऊ घातलेला गोळीबार रोखण्यात पोलिसांना यश आले.
सॅमी इगलबेअर शावेज असे या १८ वर्षे वयाच्या तरुणाचे नाव आहे. बार्टल्सव्हिले हायस्कूल या आपल्या शाळेत त्याने काही मित्रांना गुरुवारी सांगितले की तो उद्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बंदुकीने धमकावत व्यायामशाळेत नेणार असून तेथे त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करणार आहे. आपल्याकडे स्फोटकेही असून पोलीस आलेच तर त्यांचाही स्फोट आपण घडवू, असेही तो म्हणाला. त्याचे हे संभाषण एका मुलाने ऐकले आणि पोलिसांना कळविले. त्यानुसार शुक्रवारीच पोलिसांनी शावेजला अटक केली. शावेजकडे एक बंदूक सापडली असून तो अद्ययावत रायफल आणि स्फोटके मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होता, असे तपासात उघड झाले.

Story img Loader