एपी, न्यूयॉर्क
युक्रेन युद्धासाठी अमेरिकेने रशियाला दोषी ठरविण्यास नकार दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघात (यूएन) सोमवारी तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युक्रेन युद्धासंदर्भात तीन ठरावांवर मतदान झाले. अमेरिकेच्या या बदललेल्या नीतीमुळे युरोप आणि अमेरिकेच्या धोरणात मोठा फरक पडला आहे.
‘यूएन’च्या सर्वसाधारण सभेत युरोपच्या पाठिंब्याने ठेवण्यात आलेल्या ठरावावर अमेरिकेने चक्क रशियाच्या बाजूने मतदान केले. युक्रेनवर रशियाने आक्रमण केले असून, रशियाच्या सैनिकांनी तत्काळ मागे जावे, असे या ठरावात म्हटले होते. फ्रान्सच्या नेतृत्वाखाली रशियाला आक्रमक ठरविण्यात आल्याचा बदल ठरावात केल्यानंतर अमेरिकेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. फ्रान्सचे अध्यक्ष माक्राँ अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना ‘यूएन’मध्ये मतदान पार पडले. अमेरिकेने त्यानंतर सुरक्षा परिषदेत मूळ ठरावावर मतदान घेतले. १५ सदस्य देशांच्या सुरक्षा परिषदेत ठरावावर १०-० असे मतदान झाले. युरोपमधील सर्व सदस्य देशांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. ‘यूएन’मध्ये सादर करण्यात आलेला पहिला ठराव ९३-१८ असा मंजूर झाला. ६५ देश तटस्थ राहिले. या वेळी रशियाविरोधातील मते कमी झाली. यापूर्वी १४० हून अधिक देशांनी रशियाच्या आक्रमणाचा निषेध केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या ठराव सादर झाला. युद्ध संपण्याचे आवाहन करतानाच युद्धात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल संवेदना त्यात व्यक्त करण्यात आली होती. या ठरावामध्ये फ्रान्सने तीन दुरुस्त्या सुचविल्या. रशियाच्या पूर्ण आक्रमणामुळे हा संघर्ष तयार झाल्याचे त्यात म्हटले होते. रशियानेही संघर्षाची मूळे काय होती, हे नमूद करण्याचा प्रस्ताव सादर केला. सर्व दुरुस्त्यांना मंजुरी मिळाली आणि हा ठराव ९३-८ असा मंजूर झाला. ७३ देश तटस्थ राहिले. ‘यूएन’ची सर्वसाधारण सभा युक्रेनच्या बाजूने असल्याचे यामुळे स्पष्ट झाले. दुसऱ्या ठरावावर अमेरिकेने तटस्थ भूमिका घेतली.