वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुमारे दीड वर्ष चाललेल्या युद्धानंतर पश्चिम आशियातील गाझा पट्टी आत्ता कुठे सावरतेय… असं असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हा भाग ‘ताब्यात’ घेण्याची घोषणा ना पॅलेस्टिनींना आवडलीये, ना जगाला मान्य आहे ! मात्र याचं कोणतंही भान नसलेल्या ट्रम्प यांनी आता एक ‘व्हिडीओ’ समाजमाध्यम खात्यावर टाकला असून त्यामुळे टीकाकारांइतकेच त्यांचे समर्थकही नाराज आहेत… हा व्हिडीओ आहे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) तयार केलेल्या ‘ट्रम्पच्या गाझा’चा…

व्हिडीओची सुरुवात गाझामधील आत्ताच्या दृश्यांनी होते. कोसळलेल्या इमारती, धुळीचं साम्राज्य, रस्त्यातून पळणारी मुलं इत्यादी… त्यावर ‘गाझा २०२५, पुढं काय?’ असा प्रश्न विचारण्यात येतो आणि मग सुरू होते ‘एआय’ची करामत… जागोजागी ‘ट्रम्पस् गाझा’ अशा पाट्या, दुबईसारख्या गगनचुंबी इमारती, चौपाटीवर खेळणारी मुलं, रस्त्यावर फिरणाऱ्या ‘टेस्ला’ असं बरंच काही… पण यापेक्षा संतापजनक गोष्टींचाच भरणा अधिक. चौपाटीवर उघड्यानं ‘कॉकटेल’चे घोट घेणारे ट्रम्प आणि इस्रालयचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यात दिसतातच, शिवाय व्यक्तिपूजेचं सर्वोच्च प्रतीक असलेला ट्रम्प यांचा सोन्याचा भव्य पुतळाही बघायला मिळतो. एक मुलगा ट्रम्प यांच्या चेहऱ्याचा सोनेरी फुगा घेऊन पळतोय आणि चौपाटीवर दाढी असलेल्या ‘बेली डान्सर’ नृत्य करतायत… स्वत: ट्रम्प एका पबमध्ये तरुणीबरोबर नाचतायत, अशी बरीच आक्षेपार्ह दृश्ये यात आहेत. अर्थातच ट्रम्प यांचे अब्जाधीश मित्र इलॉन मस्कही व्हिडीओत झळकतात… मस्क नाचतायत आणि डॉलरचा पाऊस पडतोय, चौपाटीवर बसून ते खाद्यापदार्थांचा आनंद घेतायत इत्यादी… हे सगळं कमी म्हणून की काय, ‘‘डोनाल्ड ट्रम्प विल सेट यू फ्री… ब्रििगिंग लाईफ फॉर ऑल टू सी…’’ (ट्रम्प तुम्हाला स्वातंत्र्य देतील, सर्वांच्या डोळ्यात भरेल असं आयुष्य देतील) अशा आशयाचं गाणंही मागे वाजतं…

हा व्हिडीओ नेमका कुणी तयार केलाय हे अद्याप स्पष्ट नसले, तरी अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत:च्या समाजमाध्यम खात्यावर तो प्रसृत केल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केलाय. ट्रम्प यांच्याच मालकीच्या ‘ट्रूथ’ या समाजमाध्यमावर टीकेची झोड उठविण्यात आलीये. ‘हे जरा जास्तीच होतंय’ असे त्यांचेच पाठीराखे म्हणतायत. तर त्यांच्या चाहत्यांमधील कट्टर धार्मिक ख्रिाश्चनांनी यातील व्यक्तिपूजेवर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केलीये. ‘एखाद्याचा पुतळा उभारणं ख्रिास्तविरोधी आहे, कृपया देवाला शरण या. येशू आणि येशूच राजा आहे,’ अशी एक प्रतिक्रिया आहे, तर ‘तुम्ही चांगलं काम करताय, पण डोक्यात हवा जाऊ देऊ नका,’ असा सल्ला एका पाठीराख्यानं दिलाय. पॅलेस्टिनींच्या वंशसंहाराचा आरोप इस्रायलवर होत असताना आधी ट्रम्प यांनी गाझा पट्टी ताब्यात घेण्याची घोषणा करत जॉर्डन-इजिप्तने पॅलेस्टिनींना आश्रय द्यावा असा अनाहूत सल्ला दिला. गाझा पट्टीला ‘रिव्हिएरा’ (चौपाटीवरील पर्यटनस्थळ) करण्याचीही घोषणा केली. यावरून तीव्र नापसंती व्यक्त होत असताना आता या व्हिडीओमुळे नवा वाद निर्माण झालाय… जगातील सर्वांत शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या व्यक्तीला एखाद्याच्या दु:खावर फुंकर घालता येत नसेल, तर किमान त्याने त्यावर मीठ चोळण्याचे तरी काम करू नये, अशी अपेक्षा व्यक्त होतेय…