Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही दिवसांपासून अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. या निर्णयांमध्ये प्रामुख्याने नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क), बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा, अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा निर्णय आणि अनेक देशांवर व्यापारी कर अशा विविध निर्णयांचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन घेत असलेल्या निर्णयांचा फटाका जगभरातील अनेक देशांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर अनेक देशांवर व्यापारी कर लादल्यामुळे अनेक कंपन्यांच्या उत्पादनांवर आणि त्यांच्या किमतीवर परिणाम होत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा जगाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच ट्रम्प प्रशासन दररोज घेत असलेल्या वेगवेगळ्या निर्णयांचा परिणाम अमेरिका, भारतासह अनेक देशातील शेअर बाजारात देखील पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरापासून अनेक देशातील शेअर बाजारात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, अशी परिस्थिती असतानाही मी माझी धोरणे कधीही बदलणार नाही, अशी भूमिकाच डोनाल्ड ट्रम्प मांडत असल्याचं पाहायला मिळत आहे.
अमेरिकेने अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात कर लादल्यामुळे बाजारपेठेत घसरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भूमिका मांडताना डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी या संदर्भात मोठं भाष्य केलं आहे. जागतिक बाजारपेठेत होत असेल्या घसरणीच्या अनुषंगाने काही पत्रकारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारला. यावर ट्रम्प यांनी म्हटलं की, “कधीकधी तुम्हाला काहीतरी दुरुस्त करण्यासाठी औषध घ्यावं लागतं”, अशी प्रतिक्रिया देत आपण घेतलेल्या निर्णयांवर ठाम असल्याचं सूचक भाष्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, जागतिक बाजारपेठेतील गोंधळाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं असता आपण जाणूनबुजून बाजारातील विक्री घडवून आणत नाहीत, असं म्हटलं. तसेच यावेळी ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यावर टीका देखील केली. “अमेरिकेला इतर देशांनी वाईट वागणूक दिली. इतर देशांनी आपल्या देशाला वाईट वागणूक दिली, याचं कारण म्हणजे आपल्याकडे आधी जे नेतृत्व होते, ते मूर्ख नेतृत्व होते ज्यामुळे हे घडलं”, असं म्हणत ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यावर टीका केली.
“श्रीमंत होण्याची हीच योग्य वेळ”, डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट चर्चेत!
ट्रुथ या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “अमेरिकेत येणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांनो, मी माझ्या धोरणांमध्ये कधीही बदल करणार नाही. श्रीमंत होण्याची, पूर्वीपेक्षा जास्त श्रीमंत होण्याची ही उत्तम वेळ आहे”, अशी डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या विरोधात अमेरिकन रस्त्यावर
डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या धोरणांच्या विरोधात हजारो अमेरिकन नागरिक ‘हॅन्ड्स ऑफ’ असे पोस्टर्स हातात घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये कपातीचा निर्णय, देशाची अर्थव्यवस्था, मानवाधिकार आणि टॅरिफ धोरण अशा मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले आहेत. काही दिवसांपूर्वी युनायटेड स्टेट्समधील सरकारी जमिनींचे व्यवस्थापन आणि माजी सैनिकांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली, गृह, ऊर्जा, माजी सैनिक व्यवहार, कृषी, आरोग्य आणि मानवी सेवा अशा विभागातील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशा वेगवेगळ्या निर्णयांच्या निषेधार्थ आता अमेरिकन नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला आहे.