Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळात भारतातील लोकशाही व्यवस्था आणि निवडणूक प्रक्रियेसाठी तब्बल २.१ कोटी डॉलर्स दिले गेले, आसा दावा विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. गुरूवारी (स्थानिक वेळेनुसार) रिपब्लिकन गव्हर्नर्स असोसिएशन (RGA) च्या बैठकीत भाषण करत असताना ट्रम्प यांनी आणखी एक खुलासा केला आहे. बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी २.९ कोटी डॉलर्स दिले गेले. तर नेपाळमधील जैवविविधतेसाठी १.९ कोटी डॉलर्सचा निधी दिला गेला, असेही त्यांनी सांगितले.

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन्सला संबोधित करताना म्हणतात की, “भारतात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी २.१ कोटी डॉलर्स देण्याची गरजच काय? भारतातील मतदानाच्या टक्क्याशी आपल्याला काय करायचे? आपल्याकडेही बऱ्याच अडचणी आहेत. आपल्याला आपला मतदानाचा टक्का वाढवायचा आहे. पण हा पैसा भारताला खरोखर मिळाला आहे का? तुम्हाला माहितीये का, हा पैसा भारताला मिळाला आणि त्यांनी खर्च केला, असे होत नाही. त्यांनी तो पाठविणाऱ्यांना परत केला.” डोनाल्ड ट्रम्प यांनी यानिमित्ताने बायडेन प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

बांगलादेशला २.९ कोटी डॉलर्स देण्याची काय गरज?

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, “बांगलादेशमधील राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी २.९ कोटी डॉलर्स देण्याची गरज काय? राजकीय परिस्थितीबद्दल कुणालाच काही माहीत नाही. नेपाळमधील वित्तीय संघराज्यवादासाठी २ कोटी आणि जैवविविधतेसाठी १.९ कोटी डॉलर्स देण्यात आले. तसेच आशियातील शिक्षण क्षेत्रात सुधार करण्यासाठी ४.७ कोटी डॉलर्स खर्च करण्यात आले. आपण या सर्व बाबींची काळजी का करतोय? आपल्याकडे बरेच विषय प्रलंबित आहेत. आता आम्ही हे संपुष्टात आणणार आहोत.”

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांना उत्तर देताना भाजपाचे नेते अमित मालवीय म्हणाले की, भारतातील काही प्रभावशाली संस्थांना मदत करण्यासाठी या निधीचा वापर झाला असावा. तर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर आरोप केला. काँग्रेस पक्षाला या कथित लाचखोरीतून फायदा झाला का? हे तपासण्याची मागणी त्यांनी केली.

Story img Loader