वृत्तसंस्था, वेस्ट पाम बीच

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा अध्यक्षपदावर येण्यासाठी आवश्यक ते मार्ग शोधत आहेत. ‘तिसऱ्यांदा अध्यक्षपदावर येण्याचे माझे विधान हा काही विनोद नाही. तसे करण्यासाठी घटनात्मक पेच कसा दूर करायचा, यासाठी आवश्यक पर्यायांचा विचार करीत आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, ‘…असे करण्यासाठी काही टप्पे आहेत. मला अनेक लोकांनी तिसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी विचारले आहे. तसे झाले, तर ते कदाचित चौथ्यांदा अध्यक्षपद ठरेल. कारण २०२० ची निवडणुकीत गैरव्यवहार झाले होते. तुम्हाला काहीही वाटत असले, तरी आता मी तिसऱ्यांदा अध्यक्षपदाच्या विषयावर बोलणार नाही. आणखी बराच वेळ आहे.’

अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट सलग चार वेळा अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर अमेरिकेत १९५१ मध्ये २२ वी घटनादुरुस्ती केली गेली. त्यात दोनहून अधिक वेळा अध्यक्षपदी कुणालाही निवडून येता येणार नाही, असा नियम तयार केला गेला. ट्रम्प यांनी आता पुन्हा तिसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी स्पष्ट संकेत दिल्याने अमेरिकेतील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. इतक्यात ट्रम्प यांनी हा विषय घेतला नसला, तरी आगामी काळात ते यावर विचार करतील, असे संकेत त्यांनी स्पष्टपणे दिले आहेत.