Donald Trump Reciprocal Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ (आयात शुल्क) धोरणाचा फटका जगभरातील देशांना बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प दररोज नवनवीन निर्णय घेत आहेत. या निर्णयांचा फटका अनेक देशांना सहन करावा लागत आहे. ट्रम्प यांनी लादलेल्या रेसिप्रोकल टॅक्सला (Reciprocal Tax) ९० दिवसांची स्थगिती दिली असली तरी चीन आणि अमेरिका यांच्यातील ‘टॅरिफ वॉर’ अद्यापही सुरुच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
अमेरिकेने नुकतीच चीनवर २४५ टक्के आयात कर लादण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर चीन पुन्हा अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देणार का? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं. मात्र, या ‘टॅरिफ वॉर’मधून आता चीनने काहीशी माघार घेतल्याचं बोललं जात आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबाबत एक मोठा दावा केला आहे. अमेरिकेने चीनवर २४५ टक्के आयात कर लादल्यानंतर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्याशी अनेकदा संपर्क साधल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, चीनबरोबरच्या व्यापाराच्या मुद्द्यावर तोडगा निघेपर्यंत टिकटॉकवरील करार पुढे ढकलण्यात येणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच चिनी वस्तूंवरील अमेरिकेचे शुल्क कदाचित जास्त वाढणार नाही, तसेच कमीही होऊ शकते असे संकेतही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
“चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. मला वाटतं की ते सुरू राहतील. मी म्हणेन की त्यांनी (शी जिनपिंग यांनी) अनेक वेळा संपर्क साधला आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वतः तुमच्याशी संपर्क साधला होता की चिनी अधिकाऱ्यांनी संपर्क साधला होता? असा प्रश्न विचारला असता यावर उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “बरं, ते सारखंच आहे. चीनच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशीही असेल.”
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं होतं?
अमेरिकेने चीनवर अतिरिक्त आयात कर लादल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया दिली होती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटलं होतं की, “जर अमेरिकेला खरोखरच संवाद आणि वाटाघाटीद्वारे हा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांनी दबाव आणणं, धमक्या देणं आणि ब्लॅकमेल करणं थांबवावं आणि समानता, आदर आणि परस्पर फायद्याच्या आधारावर चर्चा करावी. चीनची भूमिका अगदी स्पष्ट आहे. टॅरिफ वॉर किंवा ट्रेड वॉरमध्ये कोणीही जिंकणारा नसतो. चीनला लढायचं नाही, पण तो लढायला घाबरत नाही”, असं लिन जियान यांनी म्हटलं होतं.