वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर आयातशुल्क लागू करण्याची दीर्घकाळापासून दिलेली धमकी सोमवारी मध्यरात्रीनंतर अंमलात आली. ‘मेक्सिको आणि कॅनडामधील वस्तूंवर कोणत्याही विलंबाविना २५ टक्के आयातशुल्क वसुलीला मंगळवारपासून सुरुवात होईल, त्यात कोणताही विलंब होणार नाही’ असे ट्रम्प यांनी जाहीर केले.
चिनी मालावर फेब्रुवारीमध्ये १० टक्के कर लागू करण्यात आला होता, तो मंगळवारपासून २० टक्के इतका झाला असून प्रत्युत्तरादाखल चीनने विविध प्रकारच्या अमेरिकी मालांवर १५ टक्के आयातशुल्क लादण्याचे जाहीर केले. तर कॅनडा आणि मेक्सिकोनेही अमेरिकी मालावर परस्परशुल्क लादण्याची घोषणा केली.
फेन्टानिल या अंमली पदार्थाची तस्करी आणि बेकायदा स्थलांतराविरोधात या देशांनी आपला लढा अधिक तीव्र करावा, यासाठी ही करवाढ केल्याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला. अमेरिकेबरोबरील व्यापाराचे असंतुलनही आपल्याला संपुष्टात आणायचे आहे, असेही ट्रम्प म्हणाले. मात्र, या करवाढीमुळे महागाई वाढून विकास घटण्याची शक्यता असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
ट्रम्प म्हणाले, ‘‘कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के करवसुलीला उद्यापासून (मंगळवारपासून) सुरुवात होईल. त्यांना कर द्यावाच लागेल.’’ ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिकी बाजार कोसळला. ट्रम्प यांच्या या निर्णयांमुळे महागाईच्या फटक्याबरोबरच कॅनडा आणि मेक्सिकोबरोबर दीर्घ काळापासून सुरू असलेल्या व्यापारालाही तडा जाणार आहे. मात्र, करवाढीमुळे अमेरिकेतील उत्पादनवाढीला चालना मिळेल, असा विश्वास ट्रम्प प्रशासनाला आहे. कॅनडा आणि मेक्सिकोने सवलतीचे गाजर अमेरिकेला दाखविल्यामुळे फेब्रुवारी करवाढीचा घेतलेला निर्णय लागू करण्यात आला नव्हता. मात्र, आता कुठल्याही प्रकारची जागा या दोन्ही देशांनी शिल्लक ठेवली नसल्याचे सांगून ट्रम्प यांनी करवाढीच्या निर्णयाची घोषणा केली.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ट्रम्प यांच्या निर्णयावर कुठलेही स्पष्टीकरण नसल्याची प्रतिक्रयिा दिली आहे. तर मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लॉडिया शिनबाऊम यांनीही अमेरिकेच्या निर्णयाला लवकरच जाहीर उत्तर दिले जाईल असे सांगितले. यामुळे व्यापारयुद्ध भडकण्याची भीती आहे.
अमेरिकी भांडवल बाजारावर परिणाम
न्यूयॉर्क : अमेरिका आणि मेक्सिको, कॅनडा, चीन या देशांमध्ये भडकलेल्या व्यापारयुद्धाचा परिणाम अमेरिकेच्या भांडवली बाजारावरही झाला. बांधकाम व्यवसाय आणि विद्याुत, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचा अपवाद वगळता बहुतांश सर्व क्षेत्रांमधील कंपन्यांचा निर्देशांक कोसळला. निवडणूक निकालापासून ‘एसअँडपी ५००’मधील वाढीमुळे झालेला सर्व नफा त्यामध्ये धुवून निघाला. ‘एसअँडपी ५००’ १.४ टक्क्यांनी घटला. ‘डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज’ १.३ टक्क्यांनी म्हणजे ५८० अंकांनी घसरला. तर नासडॅकमध्येही १.४ टक्के घट झाली.
अमेरिकेने करवाढ लादल्यामुळे अमेरिकी लोकांना गॅस, कार, काचेच्या वस्तू महाग मिळतील. तसेच हजारो नोकऱ्या जातील. करवाढीमुळे व्यापारी संबंधही खराब होतील. कॅनडादेखील २५ टक्के कर लावून अमेरिकेला प्रत्युत्तर देईल. – जस्टिन ट्रुडो, पंतप्रधान, कॅनडा
अमेरिकेच्या निर्णयाला आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. आम्हीही अमेरिकी मालावर आमच्या नियमांनुसार आयातशुल्क लागू करू. मेक्सिको शहरात रविवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात याबद्दल घोषणा केली जाईल. – क्लॉडिया शिनबाऊ, अध्यक्ष, मेक्सिको
कर नेमके लागू कसे होतात ?
● परकीय वस्तूंच्या किमतींवर काही टक्के रक्कम आयात केलेल्या देशातील खरेदीदार शुल्करूपात कर म्हणून परकी विक्रेत्याला देतो. अमेरिकेत ३२८ बंदरांवर जकात आणि सीमा संरक्षण खात्याकडून करवसुली केली जाते.
● विविध वस्तूंवर विविध टक्क्यांचे कर असतात. उदा. अमेरिका सामान्यत: प्रवास कारवर अडीच टक्के, तर गोल्फच्या बुटांवर ६ टक्के आयातशुल्क लावते.
● अमेरिकेचे ज्या देशांबरोबर व्यापारी करार आहे, त्यांच्याबरोबर आयातकर कमी असू शकतात.
● अमेरिकेने मेक्सिको, कॅनडावरील वस्तूंवर २५ टक्के आयातशुल्क लावले असले, तरी अमेरिका-मेक्सिको-कॅनडा करारानुसार बहुतेक वस्तूंवर कर लागू नाही.
● आयातशुल्क आयातदार भरतात. उदा. अमेरिकी कंपन्यांकडून काही वस्तू आयात केल्या जात असतील, तर कर अमेरिकी कंपन्या भरतात आणि त्याचा बोजा ग्राहकांवर टाकतात. परिणामी वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होते. ● असे असले, तरी आपले उत्पादन महाग होत असल्याने त्याची परदेशात खरेदी होण्याची शक्यता कमी राहते. त्यामुळे निर्यात करणाऱ्या देशालाही त्याचा फटका बसतो.