न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवर लादलेली आयातशुल्काची अंमलबजावणी एका महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. मेक्सिकोमधून अमेरिकेत होणारी बेकायदा अंमली पदार्थ, विशेषतः फेंटानिलची तस्करी रोखण्यासाठी उत्तर सीमेवर १० हजार नॅशनल गार्ड तैनात करण्याचे मेक्सिकोने मान्य केल्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर मेक्सिकोचे पेसो हे चलन दिवसभरातील पडझडीनंतर वधारले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्रम्प यांनी मेक्सिकोसह कॅनडा आणि चीनवर आयातशुल्क लादण्याचे आणि त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू करण्याचा निर्णय रविवारी जाहीर केल्यानंतर सोमवारी जागतिक बाजाराला हादरे बसले. त्यामध्ये पेसोने तीन वर्षांचा नीचांक गाठला. महिनाभराची उसंत मिळाल्यानंतर मेक्सिकोच्या अध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केले की, आजपासून आमचे सहकारी सुरक्षा आणि वाणिज्य या दोन क्षेत्रांवर काम करायला सुरुवात करतील.

आयातशुल्काच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याच्या काहीच तास आधी ट्रम्प आणि शीनबॉमदरम्यान सोमवारी दूरध्वनीवरून संभाषण झाले. त्यावेळी अमेरिका आणि मेक्सिकोदरम्यान झालेल्या सहमतीनुसार, मेक्सिकोत अमेरिकेतून होणारी आधुनिक शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी कृती करण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे असे शीनबॉम यांनी एक्सवर लिहिले. तर हा महिनाभराचा काळ दोन्ही देश पुढील वाटाघाटी करण्यासाठी वापरतील असे ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिकाबरोबरचा करार मेक्सिकोसाठी अतिशय सकारात्मक असल्याचे दिसते असे आरबीसी ग्लोबल असेट मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे वाटाघाटी करण्याची संधी मिळाली आहे असे ते म्हणाले.

कॅनडा, चीनला दिलासा नाही

मेक्सिको व अमेरिकेदरम्यान करार झाल्यानंतर कॅनडाचीही आयातशुल्क लादले न जाण्याची आशा वाढली आहे. दिवसभरात कॅनडाच्या डॉलरने २२ वर्षांतील नीचांकी गटांगळी खाल्ली होती. मात्र, मेक्सिकोप्रमाणे कॅनडालाही अमेरिकबरोबर सहमतीची आशा निर्माण झाल्यामुळे कॅनडाचा डॉलर पुन्हा सुधारला. दरम्यान, अमेरिकेचा अमेरिकेचा आयातशुल्काचा निर्णय कायम राहिल्यास, तसेच प्रत्युत्तर देऊ असे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सांगितले. तर, चीनचे वैध हक्क आणि हितसंबंध यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते प्रतिउपाय केले जातील असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी जाहीर केले.

युरोपीय महासंघालाही इशारा युरोपीय महासंघावरही (ईयू) आयातशुल्क लादले जाईल असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी फ्लोरिडा येथील एका कार्यक्रमात सूचित केले. मात्र, हे आयातशुल्क कधी लादणार ते त्यांनी स्पष्ट केले नाही. दुसरीकडे, अशा कोणत्याही निर्णयाविरोधात लढा दिला जाईल असे उत्तर युरोपच्या नेत्यांनी सोमवारी दिले. ‘ईयू’च्या ब्रसेल्स येथील मुख्यालयात सोमवारी अनौपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये या संभाव्य संकटावर उपाय शोधण्यासाठी चर्चा करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us president donald trump suspend import tariffs imposed on mexico for one month zws