एपी, वॉशिंग्टन
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १२ वाजता आणि भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री १०.३० वाजता अध्यक्षपदाची शपधविधी होणार आहे. या समारंभासाठी त्यांचे रविवारी वॉशिंग्टन येथे आगमन झाले.
ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या अध्यक्षपदाची कारकीर्द सुरू करण्यापूर्वी कुटुंबीय, समर्थक आणि राजकीय मित्रांसह सोहळा साजरा केला. चार वर्षांपूर्वी जो बायडेन यांच्याकडे सत्ता सोपवून ते बाहेर पडले होते. ‘कॅपिटॉल हिल’ येथे त्यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्याने ती निवडणूक झाकोळली गेली होती.
हेही वाचा : अखेर युद्धविराम, १५ महिन्यांनंतर गाझामध्ये शांतता नांदणार
वॉशिंग्टनपासून जवळ असलेल्या व्हर्जिनिया येथे ‘ट्रम्प नॅशनल गोल्फ क्लब’ येथे ट्रम्प यांच्या स्वागतानिमित्त आतषबाजी करण्यात आली. वॉशिंग्टनमधील तापमान कमालीचे थंड असल्याने उद्घाटनाचा संपूर्ण सोहळा सभागृहात होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा शपथविधी परंपरेप्रमाणे काँग्रेसच्या पायऱ्यांवर होतो. यंदा मात्र त्यात बदल होण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती ४० वर्षांपूर्वी, १९८५मध्ये उद्भवली होती. त्यावेळ अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी दुसऱ्या अध्यक्षपदाची शपथ बाहेर न घेता काँग्रेसमध्ये घेतली होती.
ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने
एकीकडे ट्रम्प यांच्या आगमनाप्रीत्यर्थ आतषबाजी केली जात असताना त्यांच्या यांच्या नियोजित धोरणांना विरोध करण्यासाठी राजधानीत हजारो नागरिकांनी शनिवारी निदर्शने केली. ट्रम्प मंगळवारपासून अध्यक्षपदाचा कारभार सुरू करतील. त्यांना विरोध करण्यासाठी बिगरसरकारी संस्था सखी, ‘साउथ एशियन सर्व्हाव्हर्स’ यांनी ‘पीपल्स मार्च’अंतर्गत ट्रम्पविरोधात निदर्शने केली.
रिलायन्स उद्याोग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि ‘रिलायन्स फाउंडेशन’च्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी वॉशिंग्टनमध्ये थपथविधीपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीला हजेरी लावली. नीता आणि मुकेश अंबानी हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.