वॉशिंग्टन, ब्रसेल्स : मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयातशुल्क लागू करण्याच्या निर्णयानंतर, युरोपीय महासंघावरही (ईयू) आयातशुल्क लादले जाईल असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सूचित केले. फ्लोरिडा येथे एका कार्यक्रमात त्यांनी ‘ईयू’ला तसा इशारा दिला. मात्र, हे आयातशुल्क कधी लादणार ते ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही. दुसरीकडे, अशा कोणत्याही निर्णयाविरोधात लढा दिला जाईल असे उत्तर युरोपच्या नेत्यांनी सोमवारी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिका हा ‘ईयू’चा सर्वात मोठा व्यापार आणि गुंतवणूक भागीदार आहे. अमेरिका ‘ईयू’ला जितका माल निर्यात करते त्यापेक्षा जास्त माल सातत्याने आयात करत आहे. ‘युरोस्टॅट’ डेटानुसार, २०२३मध्ये अमेरिका आणि ‘ईयू’दरम्यानची व्यापारी तूट १६१.६ अब्ज डॉलर इतकी होती. मात्र, सेवा क्षेत्रात अमेरिकेची ‘ईयू’ला होणारी निर्यात अधिक असून ती जवळपास १०६.८८ अब्ज डॉलर इतकी आहे.

फ्लोरिडा येथे एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘‘युरोपीय देश आपल्या कार विकत घेत नाहीत, ते आपली कृषी उत्पादने घेत नाहीत. ते आपल्याकडून काहीही घेत नाहीत आणि आपण त्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट विकत घेतो.’’

ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अशा कोणत्याही निर्णयाविरोधात युरोप लढा देईल असे ‘ईयू’च्या नेत्यांनी सांगितले. गरज पडली तर आम्हीही अमेरिकेवर आयातशुल्क लादू, पण दोन्ही बाजूंची व्यापारावर काही सहमती झाली तर ते अधिक चांगले असेल अशी प्रतिक्रिया जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी व्यक्त केली. जर्मनी ‘ईयू’ची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून ते मोठ्या प्रमाणात निर्यातीवर अवलंबून आहेत. अमेरिका व ‘ईयू’दरम्यान व्यापारयुद्ध सुरू झाल्यास दोन्ही बाजूंचे नुकसान होऊन केवळ चीनचा फायदा होईल असा इशारा ‘ईयू’च्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कल्लास यांनी दिला.

निर्णयाचे पडसाद

● जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर अमेरिकेने फेरविचार करावा यासाठी जागतिक नेत्यांनी त्यांच्यावर दबाव आणावा असे ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांचे आवाहन

● आंतरराष्ट्रीय विकासासाठी कार्यरत असलेला ‘यूएसएड’ विभाग बंद करण्याचे ट्रम्प यांनी मान्य केल्याचे एलॉन मस्क यांची माहिती

● एलॉन मस्क प्रमुख असलेल्या ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’च्या सदस्यांना गोपनीय माहिती प्राप्त

अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याचा इशारा

तैपेई : चीनचे वैध हक्क आणि हितसंबंध यांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते प्रतिउपाय केले जातील असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी जाहीर केले. नेमकी कोणती उपाययोजना केली जाईल हे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलेले नाही. मात्र, अमेरिकेने आपले चुकीचे निर्णय मागे घ्यावेत आणि अंमली पदार्थांविरोधातील सहकार्य यापुढेही सुरू ठेवावे असे आवाहन चीनकडून करण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेच्या मदतीत कपात

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेमध्ये नवीन जमीन अधिग्रहण कायद्याच्या अंमलबजावणीदरम्यान मोठ्या प्रमाणात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्या देशाची मदत थांबवण्याचे आणि त्यांच्या धोरणांची चौकशी करण्याचे त्यांनी जाहीर केले.

युरोपीय महासंघाच्या आर्थिक हितसंबंधांवर हल्ला केला तर, आम्ही स्वत:चा मान राखू आणि त्याप्रमाणे उत्तर देऊ. अमेरिकेच्या या पवित्र्याने युरोप अधिक मजबूत होईल आणि आमचे ऐक्य वृद्धिंगत होईल. – इमॅन्युएल मॅक्राँ, अध्यक्ष, फ्रान्स