अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या पत्नी मिशेल  यांची आज तालिबान्यांच्या हल्ल्यातून वाचलेली पाकिस्तानी शिक्षणहक्क कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिच्याशी व्हाइट हाऊसमधील ओव्हल कार्यालय येथे भेट झाली. ओबामा यांनी तिने मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल तिची प्रशंसा केली. अध्यक्ष  बराक ओबामा व मिशेल ओबामा यांनी मलालाचे स्वागत करून तिचे कौतुक केले असे व्हाइट हाऊसने नंतर सांगितले. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यांमुळे पाकिस्तानातील दहशतवादात भरच पडत असल्याची टीका त्यांनी ओबामा यांच्याशी बोलताना केली. तसेच निरपराध लोक मारले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ओबामा यांना भेटून आनंद वाटला, आपण त्यांचे आभार मानतो, पाकिस्तान व अफगाणिस्तानात शिक्षणासाठी अमेरिकेने जे प्रयत्न केले ते मोठेच आहेत. सिरीयन शरणार्थीनाही अमेरिकेची मदत आहे, असे ती म्हणाली. शिक्षणावर भर दिला तर मोठा बदल घडवून आणता येईल असे मतही तिने यावेळी व्यक्त केले.
मलालाच्या धैर्याचे कौतुक करण्यात उर्वरित देशांबरोबरच आम्हीही तिच्या पाठीशी आहोत. मुलींच्या शिक्षणाचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यात तिला मदत केली जाईल असे व्हाइट हाऊसने सांगितले. मिशेल ओबामा यांनी सांगितले की, मुलींना शिक्षणाचा हक्क मिळणे गरजेचे आहे, सर्व कुटुंबांसाठी मुली शिकणे फायद्याचेच असते. त्यांचे कुटुंबच नव्हे तर त्यांच्या देशालाही ते फायद्याचे असते. आजचा दिवस हा जागतिक कन्या दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा ओबामा यांनी केली. मुलींना त्यांचे मार्ग स्वत:ला निवडू दिले तर जगात अशा मुली आहेत त्या एक दिवस देशांचे नेतृत्व करतील. त्यासाठी त्यांना स्वप्ने पाहण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मलालाने केलेल्या कामाला आमचा सलाम आहे,असे ओबामा यांनी सांगितले.
मलाला ही १६ वर्षांची असून ती सध्या इंग्लंडमध्ये बर्मिगहॅम येथे राहते पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात ती शाळेतून बसने घरी जात असताना तालिबान्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. तिने मुलींच्या शिक्षण हक्कासाठी केलेल्या कार्यामुळे तिला नोबेल पारितोषिक मिळण्याची शक्यता होती पण ते मिळाले नाही.
‘नोबेल पुरस्कार न देण्याचा समितीचा निर्णय योग्यच’
‘मला शांततेचे नोबेल पारितोषिक न देण्याचा नोबेल निवड समितीचा निर्णय योग्यच होता कारण मला अजून बरेच काम करून दाखवायचे आहे’ असे शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी जिचे नाव चर्चेत होते त्या मलाला युसुफझाई हिने म्हटले आहे. हे पारितोषिक बराच गाजावाजा होऊनही न मिळाल्याने ती काहीशी नाराज दिसत होती. पीबीएस न्यूज चॅनेलला तिने सांगितले की, नोबेल समितीचा निर्णय योग्यच होता कारण मला अजून बरेच काही करावे लागणार आहे. जर आपण नोबेल पारितोषिकाचा विचार बाजूला ठेवला तर लोकांनी आपल्याला मोठे पारितोषिक नोबेलसाठी नामांकन देऊन दिले होते व तेच आपल्यासाठी मोठे पारितोषिक आहे. आपल्या मनात एक पारितोषिक आहे त्यासाठी आपण लढत आहोत त्यासाठी आपण शिक्षणाचा प्रचार करीत आहोत, तो पुरस्कार शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला मिळणार आहे, ते पारितोषिक आपल्याला हवे आहे, मलालाच्या मते ती आता मायदेशी जाऊन दहशतवादाशी लढा देऊ इच्छिते. आपण पाकिस्तानात जन्मलो. पाकिस्तानची देशभक्त नागरिक आहोत,  देशावर माझे प्रेम आहे. दहशतवादाशी लढण्यासाठी आपण मायदेशी जाणार आहोत. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलींना शिक्षण मिळाले पाहिजे, आपण राजकारणाचा मार्ग निवडला आहे कारण त्यातून देशाची सेवा करता येईल, जर मी शिक्षणाने सक्षम झाले तर मला हवे ते यश मिळेल, असे ती म्हणाली.