Joe Biden : इस्लामोफोबियाचा सामना करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आराखडा जाहीर केला आहे. द्वेष, हिंसाचार, पक्षपातीपणा आणि मुस्लिम आणि अरब अमेरिकन लोकांविरुद्ध भेदभाव रोखण्याच्या उद्देशाने १०० पेक्षा जास्त उपायांचा समावेश त्यामध्ये करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपण्याआधी ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे धोरण पुढे राबवणार का? याबाबत आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारने इस्लामोफोबियाविरोधी योजनेवर अनेक महिने काम केले. त्यानंतर जो बायडेन हे ‘व्हाईट हाऊस’ सोडण्याच्या पाच आठवड्यांच्या आधी म्हणजे गुरुवारी या निर्णयाबाबतची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर असणार आहे. बायडेन यांच्या सरकारने इस्लामोफोबियाबाबत बनवलेल्या आराखड्यात म्हटलंय की, गेल्या वर्षभरात अमेरिकन मुस्लिम आणि अरब समुदायांविरुद्धच्या धमक्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यात ऑक्टोबर २०२३ मध्ये इलिनॉयमध्ये चाकूने वार करून ठार झालेल्या सहा वर्षीय अल्फयुमीच्या हत्येचाही उल्लेख आहे.
हेही वाचा : One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकासाठी हालचाली सुरू, सोमवारी लोकसभेत येणार!
आराखड्यात काय आहे?
जो बायडेन सरकारने इस्लामोफोबियाविरोधी आराखड्यात सविस्तर नमूद करत चार मूलभूत प्राधान्यक्रम देखील नमूद करण्यात आले आहेत. यामध्ये मुस्लिम आणि अरबांविरुद्ध द्वेषाची जागरूकता वाढवणे आणि या समुदायांच्या वारशांना अधिक व्यापकपणे ओळखणे, मुस्लिम आणि अरबांच्या सुरक्षिततेत सर्वसमावेशक सुधारणा, तसेच त्यांच्याविरुद्ध होणारा भेदभाव रोखण्यासाठी पावले उचलणे, द्वेषाचा सामना करण्यासाठी समुदायांमध्ये एकता वाढवणे यासह आदी मुद्यांचा समावेश आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अनेक मुस्लिमबहुल देशांतील लोकांवर बंदी लादली होती. आता अमेरिकेत गेल्या महिन्यात झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिकेतील मुस्लिम बहुल शहरातही त्यांनी चांगलं यश मिळवलं आहे. तरीही ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या काही अमेरिकन लोक त्यांच्या येणाऱ्या प्रशासनाबद्दल चिंता व्यक्त करत असल्याचं बोललं जात आहे.