पीटीआय, तेल अविव
युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या गाझा पट्टीमध्ये इजिप्तमधून जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचविण्यास इस्रायलने मान्यता दिल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी जाहीर केले. इस्रायल दौऱ्यात इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. मात्र ‘हमास’ने ही मदत अन्यत्र वळवू नये किंवा चोरू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे. ७ ऑक्टोबरला पहाटे हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलमध्ये मोठा हल्ला चढविल्यानंतर इस्रायल वायूदलाने त्या अतिरेकी संघटनेचा तळ असलेल्या गाझा पट्टीमध्ये तुफानी बॉम्बवर्षांव चालविला आहे. शिवाय गाझाचे अन्न-पाणी-इंधनही इस्रायलने तोडले असून सामान्य नागरिक, रुग्णांचे अतोनात हाल सुरू आहेत.
अन्य देशांनी गाझाला देऊ केलेल्या मदतीचे ट्रक इजिप्तच्या राफा सीमेवर उभे असताना इस्रायलची परवानगी मिळण्यात मध्यस्थांना यश येत नव्हते. मात्र बुधवारी इस्रायलमध्ये आलेल्या बायडेन यांना नेतान्याहू तसेच त्यांच्या युद्धकालीन मंत्रिमंडळाचे मन वळविण्यात यश आले. इस्रायल स्वत: गाझाला कोणतीही मदत पाठविणार नाही, मात्र इजिप्तमार्गे केली जाणारी जीवनावश्यक वस्तूंची मदत रोखणार नाही, असे बायडेन जाहीर केले.हमासला इशारा पॅलेस्टिनी नागरिकांसाठी येणारी मदत ‘हमास’ने अन्यत्र वळवू नये, असा इशारा बायडेन यांनी दिला. ‘‘हमासने मदत चोरली किंवा अन्यत्र वळविली तर त्यांना सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांच्या हिताची चिंता नसल्याचे दिसून येईल,’’ असे ते म्हणाले.