युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या रशियाला अमेरिकेने मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने मंगळवारी रशियन तेलाच्या आयातीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामागील सर्वात मोठे कारण रशियाच्या अर्थव्यवस्थेवर निर्बंध लादण्याचे आहे. कारण रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आहे.
युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यानंतर रशियाची आर्थिकदृष्ट्या कोंडी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी वेगवेगळे निर्बंध जाहीर केले असून त्यातील एक म्हणजे खनिज तेलाच्या आयातीवरील बंदी आहे.
आम्ही हे समजून या बंदीसह पुढे जात आहोत, की आमचे युरोपियन सहयोगी आणि भागीदार आमच्यात सामील होण्याच्या स्थितीत नाहीत, असे जो बायडेन म्हणाले.आम्ही इतिहासातील आर्थिक निर्बंधांचे सर्वात महत्त्वाचे पॅकेज लागू करत आहोत आणि त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदी बंद करणार असल्याची घोषणा ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज शेलने मंगळवारी केली. शेलने एका निवेदनात म्हटले आहे की ते रशियाकडून टप्प्याटप्प्याने सर्व हायड्रोकार्बन्स- कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने, नैसर्गिक वायू आणि द्रवीभूत नैसर्गिक वायू खरेदी करणे थांबवणार आहेत.
त्याच बरोबर शेलने रशियातील आपले सर्व्हिस स्टेशन आणि इतर ऑपरेशन्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शेलने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याबद्दल टीका केली होती.