अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी करोना लस घेतली आहे. ७८ वर्षीय बायडन यांनी करोना लस घेतली तेव्हा त्याचं लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात आलं. जेव्हा करोना लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्या मनात भीती नसावी आणि ते लस घेण्यासाठी तयार असावेत यासाठीच आपण जाहीरपणे लस घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जो बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये Pfizer-BioNTech ची लस घेतली.

“जेव्हा लस उपलब्ध असेल तेव्हा लोक तयार असेल पाहिजेत यासाठीच मी हे प्रात्यक्षिक केलं आहे. याबद्दल चिंता करण्याची काही गरज नाही,” असं जो बायडन यांनी म्हटलं आहे. ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलच्या आरोग्य सेवा प्रमुखांनी बायडन यांना करोना लसीचा पहिला डोस दिला. दरम्यान यावेळी करोनाची लस घेणारे डॉक्टर जिल बायडनदेखील उपस्थित होते.

आणखी वाचा- अमेरिकेचं ९०० अब्ज डॉलर्सचं करोना पॅकेज; बेरोजगारांना दर आठवड्याला २२ हजार तर गरजूंना मिळणार ४४ हजार रुपये

करोना लस घेतल्यानंतर जो बायडन यांनी ट्विट करत म्हटलं की, “आज मी करोनाची लस घेतली. दिवसरात्र मेहनत घेऊन हे शक्य करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि संशोधकांचे आभार. आम्ही तुमचं खूप काही देणं लागतो.

“अमेरिकेच्या नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. जेव्हा करोना लस उपलब्ध तेव्हा तुम्ही ती घ्यावी,” असं आवाहन जो बायडन यांनी केलं आहे. जो बायडन यांनी लस घेतल्याने कमला हॅरिस यांनी ट्विट करत यालाच नेतृत्व म्हणतात अशा शब्दांत कौतुक केलं आहे. कमला हॅरिसदेखील पुढच्या आठवड्यात जाहीरपणे करोना लस घेणार आहेत.

Story img Loader