युक्रेन-रशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत फ्रान्सच्या प्रयत्नांना यश आलं आहे. अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतीन यांनी एका अटीवर भेटीस सहमती दर्शवली आहे. ही अट आहे रशियाने युक्रेनवर हल्ला न करण्याची. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी बायडन आणि पुतीन यांच्यासमोर भेटीचा प्रस्ताव ठेवला होता.
असं असलं तरी बायडन आणि पुतीन यांच्या कधी आणि केव्हा भेट होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सध्या तरी ही भेट चर्चेच्या स्तरावरच आहे. साधारणपणे गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) अमेरिका आणि रशियातील भेटीबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, असा अंदाज लावला जात आहे.
दरम्यान, याआधी अमेरिकेने रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा अंदाज वर्तवला होता. यासाठी रशिया आणि युक्रेन दोन्ही देश एकमेकांवर आरोप करत आहेत. युक्रेनमधील सीमावर्ती भागातून अनेक नागरिकांचं स्थलांतरही होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने गंभीर इशारे दिले आहेत. दुसरीकडे रशियाकडून सीमेवर मोठ्या फौजफाट्याची तैनाती सुरू आहे. त्यामुळे रशिया युक्रेनवर हल्ला करण्याची शक्यता अमेरिकेचे माध्यम सचिव जेन प्सकी यांनी वर्तवली.
अमेरिकेसह इतर पश्चिमी देशांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनच्या सीमारेषेवर जवळपास दीड लाख सैन्य तैनात केलंय. त्यामुळे रशियाकडून युक्रेनवर कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे रशियाने युक्रेनवर कोणताही हल्ला करणार असल्याची शक्यता नाकारली आहे. तसेच नाटोला युक्रेनच्या सदस्यतेबाबतचा विचार सोडण्यास सांगितलं आहे.