‘आयएनएफ’ कराराबाबत चीनचे स्पष्टीकरण
बीजिंग : इंटरमिजिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी (आयएनएफ) या करारात सामील होण्याबाबत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही, असे स्पष्टीकरण चीनने दिले आहे.
मध्यम पल्ल्याची अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे कमी करण्यासाठी अमेरिकी आणि सोव्हिएत युनियन यांच्यात १९८० च्या दशकात इंटरमिजिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी (आयएनएफ) हा करार झाला होता. त्यावर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन आणि सोव्हिएत नेते मिखाइल गोर्बाचेव्ह यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्या करारामुळे २७०० लघु आणि मध्यम पल्ल्याची अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली होती. सोव्हिएत युनियनने १९८० च्या दशकात एसएस-२० ही अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे युरोपीय शहरांच्या रोखाने तैनात केल्यानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी या कराराची मदत झाली होती.
मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच या करारातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. रशिया आणि चीन अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे विकसित करत असल्याचे कारण त्यांनी दिले आहे. तसेच चीनलाही या करारात सामील करून घेतले पाहिजे असे म्हटले.
त्यावर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनिंग यांनी म्हटले की, चीनचे संरक्षण धोरण कायमच बचावात्मक राहिले आहे. अमेरिका या करारातून एकतर्फी माघार घेत आहे आणि आम्हांला विनाकारण या प्रकरणात गोवत आहे. मात्र अमेरिकेच्या दबावापुढे चीन झुकणार नाही.