थायलंडमधील रक्तहीन बंडानंतर अमेरिकेने त्यांची लष्करी मदत थांबवली असून अमेरिकेच्या लष्करप्रमुखांनी त्यांच्या थायलंडमधील समपदस्थांशी दूरध्वनीवर चर्चा करून देशात लवकर लोकशाही व्यवस्था प्रस्थापित करावी असे म्हटले आहे.
दरम्यान थायलंडमध्ये लष्कराने देशाचे सिनेट बरखास्त केले असून, बंडानंतरची धरपकड आणखी तीव्र केली आहे. माजी पंतप्रधान यिंगलक शिनावात्रा व इतर नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले असून ३५ जणांना समन्स पाठवण्यात आले आहे. सिनेट बरखास्त करण्यात आले असून कायदे करण्याची संसदेची जबाबदारी लष्कराकडे आली आहे, असे कर्नल विनथाय सुवारी यांनी सांगितले. थायलंडमध्ये लष्करप्रमुख विनथाय प्रयुथ चान ओचा यांनी रक्तहीन बंड घडवून आणले होते. १५० सदस्यांचे सिनेट बरखास्त करण्यात आल्याने तेथे लोकशाही संपुष्टात आली आहे.
अमेरिकी परराष्ट्र खात्याच्या उपप्रवक्तया मारी हार्फ यांनी सांगितले की, आम्ही परदेशी लष्करी अर्थसाहाय्य व आंतरराष्ट्रीय लष्करी शिक्षण व प्रशिक्षण या अंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत बंद केली आहे. असे असले तरी सगळी मदत बंद करण्यात येणार नाही. अमेरिकेने २०१३ मध्ये थायलंडला १०.५ कोटी डॉलर द्विपक्षीय मदत दिली होती. आसियान, अॅपेक यासारख्या कार्यक्रमांनाही निधी दिला जात असतो, त्यात थायलंडला किती निधी दिला जातो याचा आढावा घेणार आहोत.
पेंटॅगॉनचे प्रसिद्धी सचिव रिअर अॅडमिरल जॉन किरबी यांनी सांगितले की, दोन्ही जनरलचे संभाषण हे सकारात्मक झाले व थायलंडमध्ये लोकशाही तत्त्वांचा अवलंब व्हावा अशी आमची अपेक्षा आहे.
दरम्यान, थायलंडमध्ये राजकीय व सामाजिक अस्थिरता असल्याने अमेरिकी नागरिकांनी थायलंडमध्ये विशेष करून बँकॉकमध्ये प्रवास करू नये, असा इशारा परराष्ट्र खात्याने दिला आहे.
थायलंडची लष्करी मदत अमेरिकेने थांबवली
थायलंडमधील रक्तहीन बंडानंतर अमेरिकेने त्यांची लष्करी मदत थांबवली असून अमेरिकेच्या लष्करप्रमुखांनी त्यांच्या थायलंडमधील समपदस्थांशी दूरध्वनीवर चर्चा करून देशात लवकर लोकशाही व्यवस्था प्रस्थापित करावी असे म्हटले आहे.
First published on: 25-05-2014 at 05:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us pulls out from military exercises in thailand