डेव्हिड हेडलीच्या जबाबानंतर अमेरिकेचे भारताला आश्वासन
मुंबईत २००८ मध्ये झालेल्या हल्ल्यातील माफीचा साक्षीदार व दहशतवादी डेव्हीड हेडली याने व्हिडीओमाध्यमातून दिलेल्या जबानीनंतर अमेरिकेने या हल्ल्यात सामील असेलल्यांना शिक्षा करण्यात अमेरिका भारताला मदत करील असे सांगितले आहे. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला झाला त्याच्या आधी हल्ल्याचे दोन प्रयत्न फसले होते, असे हेडली याने जबाबात सांगितले होते. या हल्ल्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना शिक्षा घडवण्यासाठी भारताला अमेरिकी कायद्याच्या कक्षेत बसेल तितकी मदत करण्यास आमची तयारी आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आम्ही हेडलीच्या जबाबास परवानगी दिली त्यामुळे पाकिस्तानच्या हल्लेखोरांना शिक्षा घडवण्यास मदत करण्याचा हेतू अमेरिकेने स्पष्ट केला आहे. सीमेपलीकडून दहशतवाद थांबवला जावा असेच आम्हाला वाटते.
पाकिस्तानी-अमेरिकी दहशतवादी हेडली याने भारतीय न्यायालयापुढे जबाब दिल्यानंतर विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना किरबी यांनी सांगितले की, आम्ही भारताबरोबरचे संबंध सुधारण्यावरच भर दिला आहे व आमचे सहकार्य सुरूच राहील. हेडलीने जी जबानी दिली त्याला राजनैतिक पातळीवर मोठे मूल्य आहे असे आम्ही गृहीत धरलेले नाही, पण त्यावर बोलण्यास आपण असमर्थ आहोत. अमेरिकी न्याय व्यवस्थेने त्याबाबत पुढाकार घेतला पण मूळ निर्णय ओबामा प्रशासनाचा होता. भारताशी अमेरिकेचे अनेक क्षेत्रात चांगले संबंध आहेत.

डेव्हिड हेडली

Story img Loader