सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी हंगामी सरकारबाबत वाटाघाटी करण्यास तयार असतील, तर त्या सुरू करता येतील तोपर्यंत त्या थांबवण्यात येत आहेत, असे व्हाइट हाउसने आज सांगितले. जीनिव्हातील बोलणी रोखण्यात आली असून या वाटाघाटींचा तिसरा टप्पा सुरू होण्यासाठी हंगामी सरकारबाबत असद यांनी चर्चा करण्यास राजी व्हावे कारण जीनिव्हा जाहीरनाम्यात तसे म्हटले आहे, असे व्हाइट हाउसचे प्रसिद्धी सचिव जे कार्नी यांनी सांगितले.  
असद यांच्या राजवटीने पहिल्या दोन फे ऱ्यात ही अट मान्य करण्यास नकार दिला असून आमच्या मते चर्चेतील तीच पहिली अट असणार आहे. सीरियात निवडणुका होत असून ती लोकशाहीची थट्टा आहे त्यामुळे त्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, चर्चेत प्रगती न होण्यास असद हेच जबाबदार आहेत, असा आरोप कार्नी यांनी केला. जीनिव्हा जाहीरनाम्याच्या आधारे सीरियाला खरोखर वाटाघाटी करायच्या असतील, तरच आम्ही पुढे जाण्यास तयार आहोत असे अमेरिकेने म्हटले आहे.
सीरियातून लोकांचे स्थलांतर
सीरियातील पेचप्रसंगामुळे तेथून मोठय़ा प्रमाणात लोक पलायन करीत असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. इंटरनल डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटर या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे, की ३ कोटी ३३ लाख लोकांनी गेल्या वर्षभरात हिंसाचारग्रस्त देशांमधून स्थलांतर केले असून त्यात सीरिया, कोलंबिया, नायजेरिया, काँगो व सुदान या देशांचा समावेश आहे. सीरियात दिवसाला ९५०० लोकांनी पलायन केले असून ६० सेकंदांला एका कुटुंबाने स्थलांतर केले आहे. सर्वात जास्त स्थलांतर सीरियातून झाले आहे. नायजेरियातून ३३ लाख लोकांनी स्थलांतर केले, असे या अहवालात म्हटले आहे.

Story img Loader