104 Percent Tarrif on China : डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या Reciprocal Tariffs मुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अनेक देशांनी या अतिरिक्त व्यापार करांचा विरोध केला असून काही देश त्यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत. चीननं ट्रम्प यांच्या व्यापर कराला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेवर अतिरिक्त कर लागू करण्याचा इशारा दिला. त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेनं आता चीनवर १०४ टक्के कर लागू केला आहे. त्यामुळे चीनसाठी हे मोठं आर्थिक संकट ठरण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच या ‘टॅरिफ वॉर’चा भारताला फटका बसण्याची भीती केंद्रीय सचिवांनी व्यक्त केली आहे. मनीकंट्रोलनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
‘टॅरिफ वॉर’ चीनला भोवणार?
अमेरिकेनं आधी चीनवर ३४ टक्के समन्यायी व्यापार कर अर्थात रेसिप्रोकल टॅरिफ लागू केले. मात्र, त्यावर चीननं आक्रमक धोरण स्वीकारत अमेरिकेवरच अतिरिक्त व्यापार कर लागू करण्याची धमकी दिली. यामुळे संतप्त झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आणखी ५० टक्के म्हणजेच एकूण ८४ टक्के व्यापार कर लागू करण्याचा इशारा दिला. यानंतर अखेर बुधवारी ट्रम्प प्रशासनाने चीनवर तब्बल १०४ टक्के समन्यायी व्यापार कर लागू केल्याचं जाहीर केलं. यामुळे जागतिक राजकीय तसेच आर्थिक संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एकीकडे ट्रम्प प्रशासनाने चीनविरोधात उघड ‘टॅरिफ वॉर’ छेडलं असताना दुसरीकडे चीननं आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून चीननं आत्तापर्यंत ज्यांच्याविरुद्ध कायम विरोधी भूमिका घेतली, त्या भारताला साकडं घातलं आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेसमोर चीनला पुन्हा एकदा ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ उक्तीचा साक्षात्कार झाला असून “भारत व चीनने या परिस्थितीत एकत्र यायला हवं”, असं आवाहन चीनकडून करण्यात आलं आहे.
भारतावर परिणाम होण्याची शक्यता
दरम्यान, चीन व अमेरिकेत चालू असलेल्या या व्यापार कर युद्धाचा फटका अप्रत्यक्षपणे भारताला बसण्याची भीती माहिती व तंत्रतज्ञान विभागाचे केंद्रीय सचिव एस. कृष्णन यांनी व्यक्त केली आहे. चीनवर निर्बंध लादल्यामुळे भारतातून अनेक कंपन्यांची निर्यात वाढून त्यातून भारताला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण त्यापाठोपाठ भारताला फटकाही बसू शकतो, असं एस. कृष्णन म्हणाले आहेत.
चीनचा माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत?
अमेरिकेत निर्यात होणाऱ्या चिनी मालावर १०४ टक्के व्यापार कर लागू करण्यात आल्यामुळे आता चीनकडून हा सर्व माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवला जाण्याची शक्यता एस. कृष्णन यांनी व्यक्त केली आहे. शिवाय, एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत येणार असल्यामुळे तो इतर मालाच्या तुलनेत कमी किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चीनकडून दाखल केला जाऊ शकतो, असाही अंदाज एस. कृष्णन यांनी व्यक्त केला आहे. याचाच फटका भारतीय उत्पादकांना बसण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
लगेच परिणाम नाही, पण…
दरम्यान, या परिस्थितीत लगेचच भारतीय मालाला किंवा उत्पादकांना चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. “ही फक्त एक शक्यता आहे. आपण सर्व प्रकारच्या शक्यतांसाठी तयार असायला हवं. त्यासाठी केंद्र सरकार या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेत आहे. आपण सध्या इतरांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहोत. केंद्र सरकार सध्या सर्व संबंधितांशी, उत्पादक कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा करत आहे. उत्पादक कंपन्यांमध्येही सध्या या सगळ्या घडामोडींबाबत चिंतेचं वातावरण नाही”, असंही एस. कृष्णन यांनी स्पष्ट केलं.