अमेरिकी काँग्रेसच्या समितीने पाकिस्तानची मदत १ कोटी डॉलरने कमी केली असून पेचप्रसंगाने ग्रस्त असलेल्या युक्रेनला ही मदत आता दिली जाणार आहे.
पाकिस्तानला दरवर्षी १.५ अब्ज डॉलर इतकी मदत दिली जाते, त्यातील १०० लाख डॉलर इतकी रक्कम आता रेडिओ फ्री युरोपच्या युक्रेनियन, बाल्कन, रशियन व ततार भाषेतील सेवेसाठी तसेच व्हॉईस ऑफ अमेरिका व रेडिओ लिबर्टी यांच्या या भाषांमधील सेवांना मदत दिली जाणार आहे, असे अमेरिकी काँग्रेसच्या समितीने तयार केलेल्या विधेयकात म्हटले आहे.
‘एचआर ४२७८ – युक्रेन पाठिंबा कायदा’ असे या विधेयकाचे नाव असून हे विधेयक अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार सभागृह समितीने मंजूर केले आहे. समितीचे अध्यक्ष एड रॉइस व मानांकन सदस्य एलियट एंजेल यांनी गेल्या आठवडय़ात हे विधेयक मांडले आहे. युक्रेनचे सार्वभौमत्व व तेथील लोकशाही संस्थांना बळ देण्यासाठी अमेरिकेने ही मदत युक्रेनला देण्याचे जाहीर केले आहे.
केरी-ल्युगर-बेरमन विधेयकातील निधी हा अमेरिकी काँग्रेसच्या परराष्ट्र व्यवहार समितीने पाकिस्तान भागीदारी कायदा २००९ मध्ये मंजूर केला होता. अमेरिकी काँग्रेसचे सदस्य अॅलन ग्रेसन यांनी सांगितले की, पाकिस्तानची मदत कमी करून ती युक्रेनला दिली जात आहे.
युक्रेनच्या हितरक्षणासाठी
आता हे विधेयक मंजुरीसाठी प्रतिनिधिगृहाकडे पाठवले जाईल. पाकिस्तानला दिलेल्या प्रसारण विभागातील मदत कमी करण्यात येत आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण करून क्रायमिया भाग ताब्यात घेतला आहे, त्यामुळे अमेरिका व मित्र देशांनी युक्रेनच्या हिताचे रक्षण करणे गरजेचे आहे, असे रॉइस यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा