अमेरिकेतील खलिस्तानवादी संघटनांना ओबामा प्रशासनाने सणसणीत चपराक दिलीये. भारतात १९८४ मध्ये शिखांविरुद्द भडकलेली दंगल हा वांशिक हल्ला होता, असे जाहीर करण्याची खलिस्तानवादी संघटनांची मागणी ओबामा प्रशासनाने फेटाळली. १९८४मध्ये भडकलेल्या दंगलींमध्ये मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
१९८४मध्ये झालेली दंगल हा शिखांविरुद्धचा वांशिक हल्ला होता, असे ओबामा प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणी काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील शिखांच्या काही संघटनांनी एका ऑनलाईन याचिकेद्वारे केली होती. १५ नोव्हेंबर २०१२ रोजी तयार करण्यात आलेल्या या याचिकेवर पहिल्या आठवड्यातच सुमारे ३० हजार नागरिकांनी स्वाक्षऱया केल्या होत्या. कोणत्याही ऑनलाईन याचिकेवर २५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी स्वाक्षऱया केल्यास अमेरिकी प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जाते. संबंधित याचिकेतील मागणीचा आढावा घेऊन त्यावर निर्णय देण्यात येतो.
१९८४ आणि त्यानंतर शिखांविरुद्ध उसळलेल्या दंगलींमध्ये भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन झाले. शिखांवर देशात अत्याचार झाले, असे व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.