न्यू यॉर्क : अमेरिकेने १५ वर्षांच्या तपासानंतर ३०७ पुरातन वस्तू व मूर्ती भारताला परत केल्या आहेत. या वस्तूंची किंमत ४० लाख अमेरिकी डॉलर असून चोरी आणि तस्करीद्वारे या वस्तू अमेरिकेत नेण्यात आल्या होत्या. यापैकी बहुसंख्य पुरातन वस्तू कुख्यात कला व्यापारी सुभाष कपूर याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅनहॅटनचे जिल्हा दंडाधिकारी अ‍ॅल्विन ब्रॅग यांनी सोमवारी ४० लाख अमेरिकी डॉलरच्या ३०७ पुरातन वस्तू भारताला परत करण्याची घोषणा केली. सुभाष कपूरच्या कार्यालयात जिल्हा दंडाधिकारीच्या अधिकाऱ्यांनी मारलेल्या छापेमारीत २३५ पुरातन वस्तू जप्त करण्यात आल्या. अफगाणिस्तान, कंबोडिया, भारत, इंडोनेशिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड या देशांतील चोरी केलेल्या किंवा तस्करी केलेल्या पुरातन वस्तूंची विक्री करण्याचे काम सुभाष कपूर करतो, असे ब्रॅग यांनी सांगितले.

न्यू यॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासात झालेल्या एका कार्यक्रमात मॅनहॅटनच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या वस्तू परत केल्या. भारताचे महावाणिज्यदूत रणधीर जैस्वाल आणि अमेरिकी गृह सुरक्षा विभागाचे कार्यवाहक ख्रिस्तोफर लाऊ यांच्या उपस्थतीत या वस्तू परत करण्यात आल्या.

‘‘या पुरातन वस्तू तस्करांनी भारतातील विविध भागांतून चोरल्या होत्या. या वस्तूंच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाकडे दुर्लक्ष करण्यात आले. आम्हाला या वस्तू भारतातील नागरिकांना परत करताना अभिमान वाटत आहे,’’ असे ब्रॅग या कार्यक्रमात म्हणाले.

अमेरिकेने भारताला परत केलेल्या अनेक वस्तू १००० वर्षांपेक्षा अधिक पुरातन आहेत. यामध्ये विविध देवतांच्या मूर्तीचा समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us repatriates 307 antiquities valued usd 4 mn stolen trafficked from india zws
Show comments