पाकिस्तानला एफ १६ विमानांसाठी देण्यात आलेल्या आर्थिक मदतीवरुन भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी खडे बोल सुनावल्यानंतर अमेरिकेने प्रत्युत्तर दिलं आहे. भारत आणि पाकिस्तान दोघेही अमेरिकेचे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भागीदार आहेत, असं बायडन प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
एस जयशंकर यांनी रविवारी वॉशिंग्टनमध्ये भारतीय-अमेरिकी समुदायासाठी आयोजित कर्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांना अमेरिकेने पाकिस्तानला एफ-१६ विमानांच्या ताफ्यासाठी ४५० दशलक्ष डॉलर्सचं पॅकेज दिल्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध असे आहेत, ज्यामधून ना पाकिस्तानला फायदा होत आहे, ना अमेरिकेचे हित होत आहे असं म्हटलं होतं.
अमेरिकेचं प्रत्युत्तर –
“आम्ही पाकिस्तान आणि भारतासोबत असणाऱ्या संबंधांची तुलना करत नाही. दोघेही वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमचे भागीदार आहेत,” असं गृहविभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.
“आम्ही दोघांकडेही आमचे भागीदार म्हणून पाहतो, कारण अनेक बाबतीत आमच्यात सामायिक मूल्ये आहेत. अनेक मुद्द्यांवर आमचे हेतूही समान आहेत. भारत आणि पाकिस्तानसोबत असणाऱ्या संबंधाना स्वत:चा आधार आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
कुणाला मूर्ख बनवताय? पाकिस्तानला लढाऊ विमानं देण्यावरून परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिकेला खडा सवाल
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं “दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील संबंध सुधारावेत यासाठी आम्ही शक्य ते सर्व करु इच्छित आहोत. त्यामुळे हा मुद्दाही महत्त्वाचा आहे”.
एस जयशंकर काय म्हणाले आहेत?
“एकीकडे दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी आपण हे करत आहोत असं सांगायचं आणि दुसरीकडे एफ-१६ सारखी लढाऊ विमानं कुठे आणि कशासाठी दिली जात आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अशो गोष्टी सांगून तुम्ही इतरांना मूर्ख बनवत नाही आहात,” अशी टीका एस जयशंकर यांनी केली होती. “अमेरिकेची धोरणं तयार करणाऱ्यांशी बोलण्याची संधी मिळाली, तर मी नक्कीच त्यांना ते काय करत आहेत हे दाखवून देईन,” असंही ते म्हणाले होते.